
शहरात होत असलेली पाणीचोरी रोखण्यासाठी मीरा-भाईंदर महापालिका आता अॅक्शन मोडवर आली आहे. बेकायदेशीररीत्या मोटार किंवा पंप लावून पाणी उपसा केल्यास थेट नळ कनेक्शन कापून कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी पालिकेने विशेष पथक तैनात केले आहे.
मीरा-भाईंदर शहरात विविध जलकुंभांतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र अनेक ठिकाणी पाण्याचा वायफळ वापर होत आहे. घरातील पाण्याचा साठा भरून झाल्यावर नळ बंद करण्याऐवजी नागरिक त्यांच्या दुचाकी, चारचाकी गाड्या या पिण्याच्या पाण्याने धूत असतात. याशिवाय मेन लाईनवरून पाणीमाफियांनी चोरीचे कनेक्शन घेतले आहे. त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होते. याची गंभीर दखल पालिका प्रशासनाने घेतली असून बेकायदेशीररीत्या पाण्याचे कनेक्शन घेतलेल्या पाणीमाफियांची आता खैर नाही.
५० हजारांचा दंड
पालिका प्रशासनाचे विशेष पथक शहरात अनधिकृत मोटार किंवा पंप बसवलेल्या नळजोडण्यांची तपासणी मोहीम राबवणार आहेत. तपासणीदरम्यान कोणत्याही नळजोडणीवर अनधिकृत मोटार किंवा पंप आढळल्यास संबंधितावर तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे. अनधिकृत पंप किंवा मोटार आढळल्यास ती जप्त करण्याबरोबरच ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. तसेच संबंधित मालमत्तेची नळजोडणी खंडित करण्याची कारवाईही करण्यात येणार असल्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.



























































