
हिंदुस्थान-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफने घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. हिंदुस्थानात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताला बीएसएफने गोळ्या घालून ठार केले. अमृतसरमधील दाओके गावात काटेरी कुंपणाजवळ घरिंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. मृताकडे कोणतीही कागदपत्रे न सापडल्याने त्याची ओळख पटू शकली नाही. बीएसएफच्या जवानांच्या तक्रारीच्या आधारे, घरिंदा पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून शवविच्छेदनासाठी मृतदेह ताब्यात घेतला आहे.
नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, पहाटे दाओके गावाजवळ काटेरी कुंपणाच्या सीमेवर नियमित गस्त घालत असताना ही घटना घडली. बीएसएफच्या जवानांना सीमेवरील कुंपणाजवळील झुडपांमध्ये संशयित हालचाल दिसली. जवानांनी संशयिताला झुडपातून बाहेर येण्यास सांगितले. काही मिनिटांतच संशयित बाहेर येऊन काटेरी कुंपणाच्या दिशेने जाऊ लागला.
सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीला थांबण्याचा इशारा केला, मात्र तो हिंदुस्थानी सीमेच्या दिशेने पुढे जात राहिला. त्यानंतर बीएसएफच्या जवानांनी गोळीबार करून त्याला जागीच ठार केले. घटनेनंतर लगेचच बीएसएफच्या जवानांनी घरिंदा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला. घटनास्थळावरून कोणतीही प्रतिबंधित वस्तू, संशयास्पद साहित्य किंवा ओळखपत्र जप्त करण्यात आले नाही. या घटनेनंतर पंजाब सीमेवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.




























































