
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवर हल्ले सुरूच असून आज माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लक्ष्य करण्यात आले. नॉर्थ 24 परगना जिह्याच्या दौऱयावर असताना ममतांवर खुनी हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी ममतांच्या कारला घेरले आणि दगड, चपला, चिखलाचा मारा केला. या हल्ल्यातून ममता बॅनर्जी थोडक्यात बचावल्या असून त्यामुळे राजकीय वादाला तोंड फुटले आहे.
पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी ममता बॅनर्जी रविवारी हालिसहर येथे आल्या होत्या. तिथे पोहोचत असतानाच जमावाने त्यांच्या ताफ्याला घेरले. चोर, चोर अशा घोषणा दिल्या. काही लोकांनी ममतांच्या कारचा पाठलाग करत दगड, विटा, बाटल्या, चिखल आणि चप्पलफेक केली. त्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात ममतांना हा दौरा आटोपावा लागला. या घटनेमुळे संतापलेल्या ममतांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
हा भाजपच्या गुंडांचा कट
‘हा हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग आहे. मला मारण्यासाठी भाजपकडून गुंडांचा वापर केला जात आहे. माझ्या दौऱयाची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. त्यानंतरही सुरक्षेची पुरेशी व्यवस्था करण्यात आली नव्हती. पोलीस राज्य सरकारच्या इशाऱयावर काम करत आहेत. बंगाल समाजकंटकांच्या तावडीत सापडले असून पोलीस त्यांना संरक्षण देत आहेत, असा आरोप ममतांनी केला.
बंगालमध्ये जंगलराज सुरू आहे. असा हल्ला मी कधीच पाहिला नव्हता. गाडीची काच खुली असती तर माझं डोकं फुटलं असतं. माझा जागेवरच मृत्यू झाला असता.’ – ममता बॅनर्जी



























































