चार हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती पदी शिफारस; मुंबईत न्या. महेश त्रिपाठी, कोलकातामध्ये न्या. रवींद्र घुगे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चार उच्च न्यायालयातील मुख्य न्यायमूर्ती पदासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या कोलिजिअमने न्यायमूर्तीच्या नावांची शिफारस केली आहे. यात सध्या अलाहाबाद येथे कार्यरत असलेले न्या. महेश चंद्र त्रिपाठी यांची मुंबई उच्च न्यायालयातील मुख्य न्यायमूर्तीपदी शिफारस करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात हंगामी मुख्य न्यायमूर्ती न्या. रवींद्र घुगे यांची कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून शिफारस करण्यात आली आहे.

कोलिजिअमची बैठक ६ ऑगस्ट रोजी पार पडली. या बैठकीत पटना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून न्या. के. कामेश्वर राव यांची शिफारस करण्यात आली आहे. न्या. राव हे सध्या दिल्ली उच्च न्यायालयात कार्यरत आहेत. पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयातील मुख्य न्यायमूर्ती पदासाठी न्या. अश्विन मिश्रा यांच्या नावाची शिफारस कोलिजिअमने केली आहे.

हंगामी मुख्य न्यायमूर्ती घुगे यांनी कायद्याचे शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथील एमपी लॉ कॉलेजमधून घेतले. कामगार व औद्योगिक न्यायालयात त्यांनी तब्बल दोन हजार प्रकरणांत कामगार व युनियनची बाजू मांडली आहे. २०१३मध्ये त्यांची उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली.