विमानतळावर नोकरीसाठी बोगस परीक्षा; छत्रपती संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय परीक्षांतील पेपरफुटी आणि घोटाळ्यांमुळे देश ढवळून निघाला असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये विमानतळावरील नोकरीसाठी बोगस परीक्षा घेण्यात आली. तसेच, या बोगस परीक्षेच्या अर्जापोटी 500 ते 700 रुपये उकळून हजारो तरुणांना गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

एनआयए एव्हिएशन सर्व्हिसेसने काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियात कस्टमर सर्व्हिस असोसिएट पदाच्या नोकरीची जाहिरात दिली होती. 25 हजार रुपये पगाराच्या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रतेची अट बारावी पास अशी होती. त्यामुळे हजारो बारावी उत्तीर्ण उमेदवारांनी लेखी परीक्षेसाठी अर्ज केले. प्रत्येक उमेदवाराने शुल्हकही भरले. त्यानंतर संबंधित उमेदवारांना व्हॉट्सअॅप ग्रुपवर परीक्षेसंदर्भात सूचना येत होत्या. ऑनलाईन हॉलतिकीट आले. त्यानुसार 9 ऑगस्ट रोजी श्रेयस बालक मंदिर आणि शिशु विकास शाळा या दोन केंद्रांवर परीक्षा होणार होती. या परीक्षेसाठी सकाळी 11.30 ते 12.30 रिपार्ंटग वेळ होती. तर 12.30 ते 2.00 या वेळेत परीक्षा होणार होती.

पूर्वनियोजित वेळेनुसार आज उमेदवार परीक्षा केंद्रांवर आले, परंतु येथे कोणतेच नियोजन नव्हते. परीक्षा क्रमांकाची माहिती देणारा फलक नव्हता की बाकांवर क्रमांक टाकले नव्हते. परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या थर्ड पार्टी ’सीटूएक्स’ कंपनीनेही हात वर केले. त्यामुळे शेकडोंच्या संख्येने परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांचा गोंधळ उडाला. परीक्षा होणार नसेल तर पैसे परत करा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. मात्र, ते अधिकार आमच्याकडे नाहीत. त्यासाठी एनआयए एव्हिएशन सर्व्हिसेसशी संपर्क साधा, असे सांगण्यात आले. त्यामुळे विद्यार्थी संतापले. गडबड झाल्याचे लक्षात येताच पोलीस परीक्षा केंद्रावर पोहोचले. या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आल्याचे समजते.

नोकरीसाठी 75 हजार भरण्याची अट

विमानतळावरील ग्राउंड स्टाफसाठी परीक्षा होती. मात्र, डीजीसीएचे कोणतेही लेटर कंपनीकडे नव्हते. तुमची  निवड झाल्यानंतर 75 हजार रुपये भरावे लागतील, असे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर सांगण्यात आले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. पैसे भरावे लागणार आहेत हे आधीच सांगितले असते तर आम्ही अर्जच केला नसता, असे उमेदवारांनी सांगितले.