
संसद अधिवेशनाचा शेवटचा आठवडाही वादळी ठरणार आहे. पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱया विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि राम मंदिर देणगी चोरीच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना उत्तर द्यावेच लागेल, असा आक्रमक पवित्रा इंडिया आघाडीने घेतला आहे. त्यामुळे चेंडू सरकारच्या कोर्टात असून शेवटच्या चार दिवसांत तरी कामकाज होणार का याकडे लक्ष लागले आहे.
संसदेचे संपूर्ण पावसाळी अधिवेशन हे सरकारची कोंडी करणारे ठरले आहे. पहिल्या आठवडय़ात राम मंदिर लुटीच्या मुद्दय़ावरून विरोधकांनी सरकारला जेरीस आणले. दुसऱ्या आठवडय़ात त्यात विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या हल्ल्याची भर पडली. या दोन्ही मुद्दय़ांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापैकी एकाने निवेदन द्यावे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेत एकही दिवस कामकाज सुरळीत होऊ शकले नाही.
मोदी-शहा सभागृहात येत नसल्याने विरोधकांनी संसदेबाहेर निदर्शने करून सरकारला लक्ष्य केले. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची तीनदा भेट घेऊन कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला. ‘मोदी-शहांनी सभागृहात यावे. विद्यार्थ्यांवरील हल्ला व मंदिर लुटीची जबाबदारी घ्यावी,’ या मागणीवर विरोधक ठाम आहेत. काँग्रेसने आज ‘एक्स’ पोस्ट करून पुन्हा एकदा सरकारला घेरण्याचे संकेत दिले. त्यामुळे सरकार कात्रीत सापडले आहे.
जोरदार मोर्चेबांधणी
शेवटच्या आठवडय़ात सरकारकडून काही महत्त्वाची विधेयके रेटून नेली जाण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोर्चेबांधणी केली असून सर्व खासदारांना व्हीप बजावला आहे. 10, 11 व 12 ऑगस्ट रोजी सर्व खासदारांनी सभागृहात उपस्थित राहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. इंडिया आघाडीतील मित्रपक्षांनीही उपस्थितीची काळजी घ्यावी, असे काँग्रेसने कळवले आहे. सत्ताधारी एनडीएनेही आपल्या खासदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
एफसीआरए कायद्याला विरोध
सरकारकडून विदेशी निधी नियमन सुधारणा 2026 (एफसीआरए) हे विधेयक संसदेत मांडले जाण्याची शक्यता आहे. मात्र विधेयक घटनाविरोधी व जनविरोधी असल्याचे सांगत काँग्रेसने तीव्र विरोध दर्शवला आहे. उद्या कामकाज सुरू होण्याआधी यासंदर्भात विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार असून त्यात पुढील निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले.



























































