
देशभरात इथेनॉल मिश्रित पेट्रोलला प्रचंड विरोध होत असतानाच मध्य प्रदेशातील भाजपचे खासदार जनार्दन मिश्रा यांनी इथेनॉलसंदर्भात आज वादग्रस्त वक्तव्य केले. इथेनॉल चालणार नाही, म्हणून आंदोलने होत आहेत. त्यांना शुद्ध पेट्रोल हवे आहे, पण हे शुद्ध पेट्रोल या आंदोलन करणाऱयांच्या बापाच्या घरातून येणार का, असा सवाल मिश्रा यांनी केला.
जनार्दन मिश्रा हे रीवा येथील खासदार आहेत. रीवा विमानतळावर एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी इथेनॉल मिश्रित पेट्रोलला विरोध करणायांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, आंदोलन होत आहे की इथेनॉल चालणार नाही, शुद्ध पेट्रोल चालेल. शुद्ध पेट्रोल तुमच्या बापाच्या घरातून येणार आहे का?
हिंदुस्थानला 80 टक्के कच्चे तेल आयात करावे लागते. जागतिक युद्धाच्या परिस्थितीमुळे आता तेल पुरवठय़ासाठी जहाजांना 18 हजार किलोमीटरचा अतिरिक्त फेरा मारावा लागत आहे. लोक म्हणतात की इथेनॉल बनवू नका. इथेनॉल बनवले नाही तर पेट्रोल कुठून येईल, डिझेल कुठून येईल? तुमच्या बापाच्या घरातून येणार का? असे मिश्रा म्हणाले.
मिश्रा यांच्यावर सोशल मीडियातून टीकांचा भडीमार
जनार्दन मिश्रा यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरी त्यावर प्रतिक्रीया देत आहेत. एका लोकप्रतिनिधीकडून अशा पद्धतीची अशोभनीय भाषेचा वापर योग्य नाही, अशा टीकांचा भडीमार करण्यात येत आहे. मिश्रा यांनी वक्तव्य केले त्यावेळी व्यासपीठावर मध्य प्रदेशचे काही मंत्री व इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते. ते देखील मिश्रा यांचे वक्तव्य ऐकून अचंभित झाले.


























































