
बारामती येथील विमानतळावर तांत्रिक बिघाडामुळे प्रशिक्षणार्थी विमान धावपट्टीवरून घसरल्यामुळे रविवारी दुपारी बाराच्या सुमारास अपघात झाला. दोन्हीही वैमानिक सुखरूप आहेत. दरम्यान, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात दुर्घटनेच्या जखमा ताज्या असतानाच पुन्हा त्याच ठिकाणी विमान घसरल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
रविवारी दुपारच्या सुमारास प्रशिक्षण सत्रादरम्यान हे विमान धावपट्टीवरून घसरले. सुदैवाने विमानातील कॅप्टन चिराग डोईफोडे, कॅडेट अभिजित जुंद्रे हे सुखरुप आहेत. संबंधित वैमानिक सर्किट आणि लँडिंगशी संबंधित आपत्कालीन परिस्थितीचा सराव करीत होते. रविवारी सकाळी 6 वाजून 39 मिनिटांनी हे विमान सरावासाठी धावपट्टीकडे नेण्यात आले होते. त्यानंतर विमान सुरुवातीला ‘लिंक ब्राव्होद्वारे धावपट्टीवर गेले. ‘रनवे 29’ च्या सुरुवातीच्या टोकावर थांबले होते. त्याठिकाणाहून उड्डाण करण्याचा प्रयत्न थांबवण्यात आला. विमान धावपट्टीवर पूर्णपणे थांबवता आले नाही. त्यामुळे ‘रनवे 29’ च्या सुरुवातीच्या टोकापलीकडे पुढे घसरल्यामुळे विमानाचा अपघात झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
आठ महिन्यांत तीन अपघात
बारामती विमानतळावर मागील 8 महिन्यांत साधारणपणे तीन वेळा विमान अपघाताची घटना घडली आहे. 28 जानेवारीला विमान कोसळून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हवाई प्रवासावर प्रश्नचिन्ह करण्यात आले. त्यानंतर मे महिन्यात पुन्हा विमान अपघात झाला होता. बारामतीच्या गोजुबावी गावच्या हद्दीत दुसरा विमान अपघात झाला होता. संबंधित अपघातात जीवितहानी झाली नव्हती. शिकाऊ विमान हे इमर्जन्सी लँडिग करताना शेतात कोसळले होते. त्यानंतर रविवारी तिसरा विमान अपघात घडला आहे.




























































