
अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता हिमांशु मल्होत्रा यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू आहेत. दोघे वेगळे राहत असल्यापासून ते घटस्फोट घेणार असल्यापर्यंत अनेक दावे सोशल मीडियावर करण्यात आले. मात्र, आता या अफवांना अमृता आणि हिमांशु या दोघांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. दोघांनी संयुक्त पोस्ट शेअर करत अफवा पसरवणाऱ्यांना थेट कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
अमृता खानविलकर आणि हिमांशु मल्होत्रा हे मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडपं आहे. गेल्या काही काळापासून त्यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. दोघे दीड वर्षांपासून वेगळे राहत असल्याचा दावाही काही पोस्टमध्ये करण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनीही जोर धरला. या चर्चांमुळे अमृता आणि हिमांशुच्या चाहत्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला. यापूर्वी या जोडप्याने सोशल मीडियावरून आपण एकत्र असल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र, त्यानंतरही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत विविध दावे आणि अफवा पसरत राहिल्या. असे वृ्त्त एबीपी न्यूज ने दिले आहे.
सततच्या अफवांना कंटाळून अमृता खानविलकर आणि हिमांशु मल्होत्राने कठोर भूमिका घेतली आहे. दोघांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून संयुक्त पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अमृताच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असत्य, निराधार, बदनामीकारक किंवा गोपनीयतेचा भंग करणारी माहिती ऑनलाइन अथवा सोशल मीडिया माध्यमांवर प्रसारित केली जात असल्याचं म्हटलं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करून कोणत्याही प्रकारची बदनामी, अफवा किंवा खोटी माहिती तयार करून ती प्रसारित किंवा शेअर केल्यास संबंधित व्यक्ती किंवा संस्थेविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
अमृताच्या कायदेशीर टीमकडून जारी करण्यात आलेल्या या निवेदनात सोशल मीडिया युजर्स, माध्यमं आणि संबंधित व्यक्तींना सावध करण्यात आलं आहे. कोणत्याही तथ्याची पडताळणी न करता अमृताच्या खासगी आयुष्याबाबत माहिती पसरवल्यास त्याचे कायदेशीर परिणाम भोगावे लागू शकतात, असं या निवेदनातून स्पष्ट करण्यात आलं आहे. अमृता आणि हिमांशुच्या या भूमिकेमुळे आता त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत कोणत्याही प्रकारची अप्रमाणित माहिती पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार का, याकडे चाहत्यांचं आणि मनोरंजन विश्वाचं लक्ष लागलं आहे.




























































