
मुलींच्या छेडछाड प्रकरणी मध्यस्थी करणाऱ्या पितापुत्रांवर दोघा भावांनी कोयत्याने वार केल्याची घटना आज नालासोपाऱ्यातील श्रीराम नगर परिसरात घडली. शेरू खान (पिता) व अतिक खान (मुलगा) अशी हल्ला झालेल्यांची नावे आहेत. या हल्ल्यात पिता-पुत्र गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
अज्जू व अजीम ही दोन भावंडे नालासोपारातील एका मशिदीजवळ नेहमी बसत असत. त्यांच्यावर मुलींची छेडछाड केल्याचा आरोप होता. मदरशांच्या संचालकांनी यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. या प्रकरणात शेरू खान व अतिक खान यांनी मुलींची छेडछाड करणाऱया अज्जू व अजीम यांना जाब विचारला. तसेच मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. या रागातून अज्जू आणि अजीम यांनी दोन्ही पितापुत्रांवर कोयत्याने वार केला. त्यामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.




























































