
पहिला गेम गमावला म्हणून अस्मिता चलिहाने हार मानली नाही, उलट त्यानंतर खेळाचा गियर बदलला आणि चीनच्या हान कियान शीचा प्रतिकार मोडून काढत अस्मिता चलिहाने व्हिक्टर कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. 53 मिनिटे रंगलेल्या अंतिम सामन्यात अस्मिताने 14-21, 21-14, 21-14 अशी बाजी मारत बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरच्या सुपर-300 स्तरावरील कारकीर्दीतील पहिले विजेतेपद मिळवले हे विशेष.
अस्मिताचे पिछाडीवरून पुनरागमन
अंतिम सामन्याची सुरुवात अस्मिता चलिहासाठी निराशाजनक झाली. पहिल्या गेममध्ये तिला लय सापडत नव्हती. हान कियान शीने याचा फायदा घेत सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड मिळवली आणि पहिला गेम 21-14 असा जिंकला. मात्र, एका गेमने अस्मिताला रोखणे चीनच्या खेळाडूला शक्य झाले नाही. दुसऱया गेममध्ये हिंदुस्थानी खेळाडूने जोरदार फटके लगावण्यास सुरुवात केली. सातत्याने दबाव निर्माण करत अस्मिताने दुसरा गेमही 21-14 असा जिंकत सामना निर्णायक गेममध्ये नेला.
निर्णायक गेममध्ये अस्मिताचा ‘पंच’!
तिसऱया गेममध्ये सुरुवातीला दोन्ही खेळाडूंमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली. गुणांची आघाडी सतत बदलत होती. मात्र, मध्यंतरानंतर अस्मिताने सामन्याची सूत्रे आपल्या हातात घेतली. 12-11 अशी आघाडी घेतल्यानंतर अस्मिताने अचूक विनर लगावत दबाव वाढवला. त्यानंतर कोर्टच्या बाहेर जात असलेला कठीण शटलही तिने अचूकपणे कोर्टमध्ये परतवला आणि आघाडी 15-11 अशी केली. यानंतर अस्मिताने मागे वळून पाहिलेच नाही. क्रॉस-कोर्ट विनरच्या जोरावर तिने 19-14 अशी आघाडी घेतली. पुढच्याच रिटर्नमध्ये हान कियान शीचा फटका बाहेर गेला आणि अस्मिता विजेतेपदाच्या आणखी जवळ पोहोचली. अखेरीस 21-14 असा निर्णायक गेम जिंकत तिने कोरिया मास्टर्सच्या विजेतेपदावर दिमाखात नाव कोरले.




























































