
हिंदुस्थानचा आक्रमक सलामीवीर यशस्वी जैसवाल आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी करत असला तरी 2022 च्या दुलीप करंडक अंतिम सामन्यात त्याचे करीअर अक्षरशः धोक्याच्या उंबरठय़ावर आले होते, असा स्पह्टक खुलासा अजिंक्य रहाणेने केला आहे. दक्षिण विभागाचा फलंदाज टी. रवि तेजा याच्याशी झालेल्या सततच्या शाब्दिक चकमकीमुळे जैसवालवर चार सामन्यांच्या बंदीची कारवाई सामनाधिकाऱयांनी जवळपास निश्चित केली होती, पण आपण केलेल्या हस्तक्षेपामुळे ही बंदी टळल्याचे पश्चिम विभागाचा कर्णधार रहाणेने सांगितले.
दुलीपच्या या सामन्यात दोन्ही खेळाडू वारंवार एकमेकांशी भिडत होते. पंच आणि सामनाधिकारी यांनी अनेकदा इशारे दिल्यानंतरही वातावरण अधिक तापत गेले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून रहाणेने प्रथम जैसवालला शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र वाद न थांबल्याने त्यांनी त्याला काही काळ मैदानाबाहेर जाण्यास सांगितले.
रहाणेच्या मते, सामनाधिकाऱयांनी चार सामन्यांच्या बंदीचे पत्र तयार करून ठेवले होते. सामनाधिकारी स्वतः ते पत्र घेऊन त्यांच्या जवळ आले आणि म्हणाले, हे पत्र तयार आहे, पण तुम्ही परिस्थिती ज्या प्रकारे हाताळलीत, त्यामुळे मी ही कारवाई थांबवत आहे. त्यानंतर त्यांनी ते पत्र रहाणे यांच्यासमोरच फाडून टाकल्याचा दावा त्यांनी केला.
पुढे रहाणे म्हणाला, त्यावेळी यशस्वीला वाईट वाटले असेल, पण एका क्षणात करिअरची दिशा बदलू शकते. मला माझ्या सहकाऱयाला सावरणे गरजेचे वाटले. त्याने हेही स्पष्ट केले की, जैसवालच्या यशाचे श्रेय मी घेत नाही, मात्र त्या वेळी बंदी झाली असती तर त्याचे भविष्य वेगळे वळण घेऊ शकले असते.
विशेष म्हणजे, 2025 मध्येही रहाणे आणि जैसवाल यांच्यातील संबंधांबाबत तणावाच्या चर्चा रंगल्या होत्या. मुंबई क्रिकेटमधील वाद, गोव्यासाठी खेळण्याचा विचार आणि कथित किटबॅग प्रकरणामुळे दोघांचे संबंध चर्चेत आले होते. मात्र रहाणेंच्या या ताज्या खुलाशामुळे जर त्या वेळी जैसवालला खरोखर चार सामन्यांची बंदी भोगावी लागली असती तर आज हिंदुस्थानला मिळालेला हा स्पह्टक सलामीवीर कदाचित वेगळय़ाच वाटेवर गेला असता, अशी जोरदार चर्चा क्रिकेटविश्वात पुन्हा पेटली आहे.




























































