
आयपीएलमध्ये (IPL) दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व करणारा बंगालचा क्रिकेटपटू अभिषेक पोरेल याला हुगळी जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप करत एका विद्यार्थीनीने अभिषेक विरोधात तक्रार नोंदवली आहे. अटक केल्यानंतर अभिषेकला न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हुगळी (ग्रामीण) पोलीस अधीक्षक कुंवर भूषण सिंग यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, “त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याला अटक करण्याचे न्यायालयाचे स्पष्ट आदेश होते. काल उशिरा रात्री त्याला अटक करण्यात आली असून आज न्यायालयात हजर करण्यात आले.”
मोघरा पोलिसांनी पोरेलला उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील दमदम येथील त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. २० जुलै रोजी कलकत्ता उच्च न्यायालयाने पोलिसांना या प्रकरणात पोरेलला अटक करण्याचे निर्देश दिले होते. तसेच तक्रारदाराची कोणतीही छायाचित्रे प्रसारित किंवा व्हायरल होऊ नयेत म्हणून त्याचे इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईसेस जप्त करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले होते.
काय आहे नेमके प्रकरण?
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने २३ जून रोजी मोघरा पोलीस ठाण्यात अभिषेक विरोधात तक्रार नोंदवली होती. त्या तक्रारीनुसार, दोघेही गेल्या साडेतीन वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते आणि अभिषेकने तिला लग्नाचे वचन दिले होते. मात्र, मुलीने लग्नाचा तगादा लावल्यानंतर पोरेलने तिच्यासोबतचे संबंध नाकारण्यास सुरुवात केली, ज्यामुळे तिला पोलिसांत धाव घ्यावी लागली.





























































