
हिंदुस्थानची अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि अमेरिकेची नासा (NASA) यांच्यातील अंतराळ संशोधन सहकार्य आता नव्या उंचीवर पोहोचले आहे. नासाने आपल्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा मून बेस (Moon Base) कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी इस्रोला अधिकृत निमंत्रण दिले आहे. यामुळे भविष्यातील चंद्र मोहिमा, मानवी अंतराळ प्रवास आणि भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंधांना मोठे बळ मिळणार आहे. PTI ने यासंदभात वृत्त दिले आहे.
बंगळूर येथील बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
५ आणि ६ ऑगस्ट २०२६ रोजी बंगळूर येथील इस्रोच्या मुख्यालयात हिंदुस्थान-अमेरिका सिव्हिल स्पेस जॉइंट वर्किंग ग्रुपची नववी बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान अमेरिकेच्या अंतराळ संस्थेने हिंदुस्थानला हे निमंत्रण दिले. या महत्त्वपूर्ण बैठकीचे उद्घाटन इस्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन आणि हिंदुस्तानातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांच्या उपस्थितीत झाले.
काय आहे मून बेस मोहीम?
नासाच्या या ‘मून बेस’ मोहिमेअंतर्गत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मानवाचे पहिले कायमस्वरूपी तळ उभारण्याचे उद्दिष्ट आहे. या ठिकाणी अंतराळवीर दीर्घकाळ राहून काम करतील आणि चंद्राच्या पृष्ठभागावर महत्त्वपूर्ण वैज्ञानिक संशोधने करतील. हिंदुस्थानने आर्टेमिस करारावर स्वाक्षरी केलेली असून, याच शांततापूर्ण आणि शाश्वत अंतराळ भागीदारीचा विस्तार म्हणून नासाने हिंदुस्थानला या मोहिमेसाठी निमंत्रण केले आहे.





























































