
थायलंडच्या फुकेत येथून दिल्लीला येणारे एअर इंडियाचे विमान टर्ब्युलन्समुळे अचानक ३०० फूट खाली आले होते. या प्रकरणी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या विमानाच्या वैमानिकाची दुसरी डोप चाचणीदेखील (Dope Test) पॉझिटिव्ह आली असून, त्याने चक्क गांजा ओढून विमान उडवल्याचे तपासात आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली.
४ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ८:३० वाजताच्या सुमारास फुकेत येथून दिल्लीसाठी एअर इंडियाचे A320 विमान आकाशात झेपावले. भुवनेश्वरजवळ सुमारे ३० हजार फूट उंचीवर असताना विमानाला अचानक मोठे हादरे बसले. एअर टर्ब्युलन्समुळे हे हादरे बसल्याचा दावा करण्यात येत होता. यादरम्यान विमान अचानक ३०० फूट खाली आले; विमानाने हवेत गटांगळ्या खाल्ल्याचा दावा प्रवाशांनी केला होता. या प्रकरणी ‘विमान अपघात तपास विभागा’ने (AAIB) तपास सुरू केला. दोन्ही वैमानिकांची ‘सायकोॲक्टिव्ह सबस्टन्स’ (Psychoactive Substance) चाचणी करण्यात आली होती; त्यात मुख्य वैमानिक दोषी आढळल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर आता मुख्य वैमानिक दुसऱ्या उत्तेजक द्रव्य चाचणीत (डोप टेस्ट) देखील दोषी आढळला असून, त्याने गांजा ओढल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, या प्रकरणाची चौकशी सुरू असल्यामुळे अधिकृत वक्तव्य देता येणार नाही, असे एअर इंडियाने स्पष्ट केले.
आधी केला तांत्रिक बिघाड झाल्याचा दावा
या घटनेसंदर्भात आधी तांत्रिक बिघाड झाल्याचा दावा करण्यात आला होता. विमानातील ऑटो पायलट मोड बंद पडला, तसेच हायड्रॉलिक यंत्रणादेखील तीन वेळा फेल झाल्याचे सांगण्यात आले होते. सर्वप्रथम विमान एअर टर्ब्युलन्समध्ये फसल्यामुळे मोठे झटके बसल्याचा दावा केला जात होता. चालकदलाच्या सदस्यांसह १७ प्रवासी या घटनेत जखमी झाले होते, त्यापैकी काही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.


























































