
प्रसिद्ध फुटबॉलपटू आणि जगभरातील चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असणारा दिग्गज खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो सध्या पुन्हा चर्चेत आला आहे. रोनाल्डो आणि त्याची दीर्घकाळची प्रेयसी जॉर्जिना रॉड्रिग्ज हिच्याशी अखेर लग्न करुन चाहत्यंना सुखद धक्का दिला आहे. दोघांनी 11 ऑगस्ट 2026 रोजी पोर्तुगालमध्ये खासगी समारंभात लग्न केल्याची माहिती समोर आली आहे.
रोनाल्डोने जॉर्जिनासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर या विवाहाची बातमी उघड झाली. या फोटोत हे दोघे लग्नाच्या अंगठ्या घालून एकमेकांचा हात धरून उभे असलेले दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा खाजगी विवाह समारंभ त्यांच्या पाच मुलांच्या उपस्थितीत पार पडला. ब्रन्सविक ग्रुपने जाहीर केल्यानुसार, हा सोहळा पश्चिम पोर्तुगालमधील राजधानी लिस्बनजवळील कास्केस या सुंदर समुद्रकिनारी असलेल्या शहरात संपन्न झाला. ख्रिस्तियानो ज्युनियर, जुळे इवा आणि मातेओ, अलाना मार्टिना आणि बेला एस्मेराल्डा अशी त्यांच्या पाचही मुलांची नावे आहेत. रोनाल्डोने आपल्या इन्स्टाग्रामवरील लग्नाच्या पोस्टला ‘C❤️G’ असे कॅप्शन दिले आहे. रोनाल्डो आणि जॉर्जिना एका दशकाहून अधिक काळापासून एकत्र राहत असून, त्यांची पहिली भेट 2016 मध्ये माद्रिदमध्ये झाली होती. गेल्या दहा वर्षांत, माद्रिदमधील एका अनपेक्षित भेटीतून सुरू झालेले त्यांचे नाते एका भक्कम कुटुंबात रूपांतरित झाले आहे. वृत्तांनुसार, त्यांची पहिली भेट माद्रिदमधील एका गुच्ची बुटीकमध्ये झाली होती, जिथे जॉर्जिना सेल्स असिस्टंट म्हणून काम करत होती आणि त्यावेळी रोनाल्डो ला लीगामधील रियल माद्रिद क्लबकडून खेळत होता. त्यानंतर काही दिवसांनी एका ब्रँडच्या कार्यक्रमात त्यांची पुन्हा भेट झाली, जिथे त्यांना निवांतपणे एकमेकांशी वेळ घालवता आला.
View this post on Instagram
नोव्हेंबर 2017 मध्ये जॉर्जिनाने त्यांची मुलगी अलाना मार्टिनाला जन्म दिला. यापूर्वी रोनाल्डो सरोगेटच्या माध्यमातून मातेओ आणि इवा मारिया या जुळ्या मुलांचा पिता झाला होता. जॉर्जिनाने ख्रिस्तियानो ज्युनियरसह या सर्व मुलांना आपल्या कुटुंबाचा एक भाग म्हणून मनापासून स्वीकारले. या पोर्तुगीज दिग्गजाच्या नावावर 146 आंतरराष्ट्रीय गोलांचा विक्रम असून त्याने पाच वेळा प्रतिष्ठित बॅलोन डी’ओर पुरस्कार जिंकला आहे.
































































