मणिपुरात पुन्हा हिंसाचार; नागा गावावर हल्ला, ९ घरे जाळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
manipur security forces
फाइल फोटो

मणिपूरमधील कांगपोकपी जिल्ह्यातील एका नागा गावावर झालेल्या हल्ल्यात किमान नऊ घरे जाळण्यात आली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली. ही घटना मंगळवारी रात्री सुमारे ९.३० वाजता टोकपा लियांगमै नागा गावात घडली.

स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका सशस्त्र जमावाने कथितपणे गोळीबार केला आणि त्यानंतर नऊ घरांना आग लावली. यातील बहुतांश घरे कच्च्या स्वरूपाची होती. जवळच्या गावांतील रहिवासी घटनास्थळी धावून गेले आणि आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली.

परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी त्या भागात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.

लियांगमै नागा काउन्सिल, मणिपूरने या घटनेचा निषेध केला आणि दुसऱ्या समुदायातील सशस्त्र व्यक्ती या हल्ल्यामागे असल्याचा आरोप केला. या हल्ल्यात १० घरे आणि एक चर्च जाळण्यात आल्याचा दावा देखील काउन्सिलने केला.

‘निष्पाप नागरिक, निवासी मालमत्ता आणि उपासनेचे ठिकाण यांना मुद्दाम लक्ष्य करणे ही अत्यंत गंभीर आणि निंदनीय हिंसक कृती आहे’, असे काउन्सिलने निवेदनात म्हटले आहे.

या जाळपोळीस जबाबदार असलेल्यांना तातडीने अटक करून त्यांच्यावर खटला चालवण्याची मागणी नागा संघटनेने केली. तसेच या भागातील सुरक्षा व्यवस्था तातडीने अधिक मजबूत करण्याचीही मागणी करण्यात आली.