
मुले ही पालकांची मालमत्ता नाहीत. सज्ञान मुले ही स्वतंत्र व्यक्ती आहेत, असे महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवत मुलीचा ताबा मिळवण्यासाठी आईने दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायालयाने मुलीचा स्वतः निर्णय घेण्याचा अधिकार कायम ठेवला आहे.
फिर्यादीची मुलगी 17 व्या वर्षी ट्युशनसाठी घरातून गेली आणि नंतर बेपत्ता झाली. नंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती एका तरुणासोबत जाताना दिसली. पोलिसांनी मुलीचा शोध लावून तिला आईच्या स्वाधीन केले. त्यानंतर मुलगी 18 वर्षांची झाल्यावर पुन्हा घर सोडून गेली. यानंतर आईने तिचा ताबा मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेत ‘हेबियस कॉर्पस’ याचिका दाखल केली.
या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान, न्यायालयाने मुलीशी संवाद साधला असता तिने स्वेच्छेने घर सोडल्याचे सांगितले. तसेच तिला आपल्या आवडच्या मुलासोबतच आयुष्यभर रहायचे असल्याचे न्यायालयाला स्पष्ट सांगितले. यानंतर मुलीचा ताबा मिळवण्यासाठी आईने दाखल केलेली याचिका फेटाळून न्यायालयाने फेटाळून लावली.
मुलगी आता सज्ञान आहे आणि तिला तिचा जीवनसाथी निवडण्याचा अधिकार आहे. जर मुलीने स्वतःच्या इच्छेने आपला जीवनसाथी निवडला असेल, तर तिचा ताबा मिळवण्यासाठी ‘हेबियस कॉर्पस’ याचिका दाखल करता येत नाही, असे मत न्यायालयाने नोंदवले. तसेच ती अल्पवयीन असताना त्या तरुणाने तिला बेकायदेशीरपणे डांबून ठेवले होते, हा आईचा दावाही न्यायालयाने फेटाळून लावला.




























































