वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बोलेरो दरीत कोसळली; 4 जणांचा मृत्यू, 9 जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यात मृतदेह रुग्णालयातून घरी नेत असताना बोलेरो कार अनियंत्रित होऊन खोल दरीत कोसळली. यात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर चालकासह 9 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी रात्री 12.45 वाजता चिनाड गावातील एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला. यामुळे त्याला उपचारासाठी संगडाह रुग्णालयात घेऊन चालले होते. मात्र रुग्णालयात पोहचताच त्यांना मृत घोषित करण्यात आले. यानंतर नातेवाईकांनी एक बोलेरो गाडी भाड्याने घेतली. बोलेरोमधून मृतदेह घरी नेत होते. यादरम्यान, वाटेत कुटुंबातील आणि गावातील काही सदस्य गाडीत बसले.

गाडी गतलोगजवळ पोहचताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार दरीत कोसळली. यात गाडीतील चौघांचा मृत्यू झाला तर चालकासह नऊ जण जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. राजेंद्र, देस राज, रिखी राम आणि राम गोपाळ अशी मयतांची नावे आहेत. पोलीस अपघाताबाबत पुढील तपास करत आहेत.