Weather Update – मुंबई, ठाणे, पालघरमध्ये येलो तर रायगडमध्ये ऑरेंज अलर्ट जारी; मुसळधार पावसाची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईसह कोकणात पावसाने धुमशान घातले आहे. मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून हवामान विभागाने मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात येलो अलर्ट तर रायगडमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईत शुक्रवारपासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

प्रादेशिक हवामान केंद्राने बुधवारी दुपारी जारी केलेल्या अंदाजानुसार मुंबईत गुरुवारीही येलो अलर्ट कायम राहील. शुक्रवारी पावसाचा जोर कमी होऊन शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच शनिवार आणि रविवारी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

पुण्याच्या घाट क्षेत्रांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, तिथे काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकसह इतर अनेक जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि इतर भागांत बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम किंवा हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे.