
नीट पेपरफुटी प्रकरणाची सुनावणी सध्या जलदगती न्यायालयात सुरू असतानाच आणखी एक धक्कदायक माहिती उघडकीस आली आहे. नीट प्रकरणातील आरोपपत्रही फुटल्याचे समोर आले आहे. न्यायालयाने याला मोठा झटका, असे संबोधले आहे. प्रसारमाध्यमांमध्ये आरोपपत्रातील साक्षीदारांची नावे उघड झाल्याबद्दल न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले आहे. याबाबत काहीतरी ठोस पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे राऊज ॲव्हेन्यू न्यायालयातील जलदगती न्यायालयाचे विशेष न्यायाधीश अजय गुप्ता म्हणाले.
ज्या बाबी आरोपपत्राचा भाग आहे, परंतु त्यावर चर्चा झालेली नाही. त्या बाबी सध्या चौकशीच्या कक्षेत आहेत. माझ्यासाठी हा मोठा धक्का आहे, याबाबत काहीतरी करायला हवे. सुनावणीत कोणताही पक्षपात होणार नाही याची खात्री करणे ही प्रसारमाध्यमांसह सर्व संबंधितांची जबाबदारी आहे, असे न्यायालय म्हणाले.
सीबीआयने नीट यूजी पेपरफुटी प्रकरणात 13 जणांवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. याप्रकरणी 20,000 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तीन विषयांच्या तज्ज्ञांनी दिल्लीतील नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) कार्यालयातून विविध पद्धतींनी नीट परीक्षेचे प्रश्न फोडल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. गोपनीय विभागातून बाहेर पडताना आरोपींची झडती घेण्यात आली नसल्यामुळे ते हे करू शकले, असे सीबीआयने पुढे नमूद केले. न्यायमूर्ती अजय गुप्ता यांनीही सीबीआयच्या आरोपपत्राची दखल घेत 13 ऑगस्टपासून आरोप निश्चित करण्यावरील युक्तिवादाला सुरुवात होईल, असे सांगितले.





























































