मोदी-शहा लोकसभेत आले आणि गेले! एक मिनिटाचा गेस्ट अपिअरन्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे आज सूप वाजले. अधिवेशन सुरू झाल्यापासून सभागृहातून गायब असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज शेवटच्या दिवशी सभागृहात आले. मात्र, लोकसभा अध्यक्षांनी ‘वंदे मातरम्’ घेऊन कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित केले. त्यामुळे मोदी-शहांची उपस्थिती अवघ्या एक मिनिटाचा ‘गेस्ट अपिअरन्स’ ठरली.

‘नीट’ पेपरफुटीच्या विरोधी आंदोलन व राम मंदिर देणगी चोरीच्या मुद्दय़ावर यंदाचे पावसाळी अधिवेशन गाजले. आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला आणि पेलेट गनचा मारा करण्याचे आदेश कुणी दिले याचे उत्तर गृहमंत्री अमित शहा यांनी द्यावे. तसेच राम मंदिर लुटीवर सविस्तर चर्चा व्हावी, अशी विरोधकांची मागणी होती. त्याचा धसका घेऊन मोदी आणि शहा यांनी सभागृहात येणेच टाळले. अधिवेशन संपण्याच्या एक दिवस आधी शहांनी चर्चेची तयारी दाखवली; मात्र शेवटच्या दिवशी चर्चेची तयारी दाखवण्याची सरकारची ही पळवाट विरोधकांनी बंद केली. भाषण नको, उत्तर द्या असा आग्रह विरोधकांनी कायम ठेवला. संसदीय संकेत म्हणून पंतप्रधान मोदी व अमित शहा लोकसभेत हजर राहिले. मात्र त्यांचा सहभाग एका मिनिटाचा ठरला. लोकसभेचे कामकाज अवघे एक मिनिट चालले, तर राज्यसभेत एका तासाचे कामकाज झाले.

 पावसाळी अधिवेशनातील नियोजित 114 तासांच्या कामकाजापैकी लोकसभेत फक्त 18 तास काम झाले. उर्वरित 96 तासांचा कामकाजाचा वेळ गोंधळात वाया गेला. लोकसभेच्या एकूण 19 बैठका झाल्या. मात्र, सभागृहाचे कामकाज एकही संपूर्ण दिवस चालले नाही.