
एअर इंडियाच्या वैमानिकाने चक्क गांजा ओढून विमान उडवल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता एअर इंडियाने कठोर पाऊल उचलले आहे. यापुढे प्रत्येक वैमानिकाची दररोज चाचणी होणार असून त्यांनी अमली पदार्थ किंवा प्रतिबंधित औषधांचे सेवन केले की नाही, हे तपासण्यात येईल. ही चाचणी आजपासूनच सक्तीची करण्यात आली आहे.
गेल्या आठवडय़ात फुकेट येथून नवी दिल्लीला येणाऱया विमानाच्या मुख्य वैमानिकाचीच ड्रग टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. या विमानात भुवनेश्वरच्या जवळपास असताना टर्ब्युलन्ससारखी परिस्थिती निर्माण झाली होती. काही प्रवासी त्यात जखमी झाले होते. या विमानाच्या दोन्ही वैमानिकांची उत्तेजक द्रव्य चाचणी घेण्यात आली होती. त्यात मुख्य वैमानिकाने गांजा पिल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर केंद्र सरकारने एअर इंडियाला प्रवाशांच्या सुरक्षेसोबत हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, विमान अपघात तपास संस्थेने एअर इंडियाच्या घटनेची चौकशी सुरू केली आहे. विमान अचानक 300 फुट खाली का आले, त्यावेळी विमानाची यंत्रणा कोणत्या स्थितीत होती, हवामान आणि टर्ब्युलन्सची स्थिती आणि भूमिका काय होती, वैमानिकांनी काय पावले उचलली, इत्यादींबाबत तपशिल गोळा करण्यात येत आहे.





























































