
राज्य सरकारने गोपाळकाल्याची सार्वजनिक सुट्टी रद्द करून ती रक्षाबंधनाच्या दिवशी जाहीर केली आहे. त्यामुळे मुंबईत मोठय़ा प्रमाणात साजरा होणाऱ्या गोपाळकाल्याला हजारो मराठी तरुण मुकणार आहेत. त्यामुळे रक्षाबंधन सुट्टीचा पुनर्विचार करावा आणि गोपाळकाल्याला सार्वजनिक सुट्टी द्यावी, अशी मागणी गणेशोत्सव समन्वय समितीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
गोपाळकाल्याची सुट्टी रद्द केल्याचा प्रकार मराठी संस्कृतीवर आणि मराठी सण उत्सवात दुजाभाव करणारा आहे. कारण दहीकाल्यादिवशी मुंबई, ठाणे आणि संपूर्ण ‘एमएमआर’ क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात दहीहंडीचे आयोजन करण्यात येते. मात्र गोपाळकाल्याची सुट्टी रद्द केल्यास हजारो तरुण या उत्सवाला मुकणार आहेत. त्यामुळे सामाजिक अणि सांस्कृतिक सलोख्याच्या दृष्टीने गोपाळकाल्याची सुट्टी देणे आवश्यक आहे. गोपाळकाल्याला सार्वजनिक सुट्टी दिल्यास मुंबई शहर, उपनगरात वाहतूककाsंडी कमी होईल. त्यामुळे दहीहंडी आयोजनातही अडथळा निर्माण होणार नाही. त्यामुळे गोपाळकाल्याला सुट्टी द्यावी अशी मागणी बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे. याबाबत समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर, प्रमुख कार्यवाह गिरीश वालावलकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे.
विसर्जन दिवसाप्रमाणे मूर्तींच्या आगमनासाठी वाहतुकीचे नियोजन करा
गणेशोत्सवात गौरी विसर्जन आणि अनंत चतुर्दशीला ज्याप्रमाणे वाहतुकीचे नियोजन करण्यात येते, त्याचप्रमाणे आगमन कालावधीमध्येही वाहतुकीचे नियोजन करा, अशी मागणीही बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे. याबाबत समन्वय समितीने पोलीस आयुक्त देवेन भारती, वाहतूक पोलीस आयुक्त सत्यनारायण यांना निवेदन दिले आहे. पुढील दोन आठवडे मुंबईतील हजारो मंडळे बाप्पाच्या मूर्ती लालबाग, परळ, दादर परिसरातून मंडपामध्ये घेऊन जाणार आहेत. यावेळी मोठय़ा प्रमाणात भाविक येत असल्याने गर्दी होणार आहे. त्यामुळे मूर्ती नेण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी एकेरी वाहतूक करावी, अशी मागणी समन्वय समितीकडून अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी केली आहे.






























































