
स्वच्छ-सुंदर मुंबईसाठी एकीकडे पालिकेने कचरा करणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यास सुरुवात केली असताना चक्क पालिकेच्या मुख्यालयातच दारूच्या बाटल्या आणि कचऱ्यांचे साम्राज्य असल्याचे आढळल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
पालिकेच्या फोर्ट येथील मुख्यालयातून संपूर्ण मुंबईचा कारभार हाकला जातो. त्यामुळे मुख्यालयात प्रवेश करताना प्रत्येक व्हिजिटर्सची तपासणीही केली जाते. शिवाय जुन्या इमारतीसह सर्व मजल्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. असे असताना तळमजल्यावरील मोकळ्या जागेत दारूच्या बाटल्या, कचरा आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही माहिती समोर येताच मुख्यालयातील पालिका अधिकाऱयांची चांगलीच धावपळ उडाली. या कुठून आल्या याचा शोध प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.
सुरक्षेचा प्रश्न गंभीर
गटारी अमावास्येनंतरच हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे मुख्यालयात काही जणांनी गटारी साजरी केल्याचे बोलले जात आहे. प्रशासकीय इमारतीसारख्या संवेदनशील ठिकाणी सुरक्षा आणि नियमांना डावलून हा प्रकार घडलाच कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवाय या प्रकारामुळे पालिकेतील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.






























































