पालघरची माध्यान्ह भोजन योजना वादाच्या भोवऱ्यात; चौकशी करा, शिवसेनेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालघर जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जात असलेल्या माध्यान्ह भोजन योजनेसाठी अन्नधान्य आणि आवश्यक वस्तूंचा नियमित पुरवठा केला जात नसल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर सकस आहार मिळत नसल्याने ही योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. माध्यान्ह भोजनासाठी आवश्यक असलेले किरकोळ साहित्यही वेळेवर उपलब्ध होत नसल्याने या योजनेची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पक्षाचे पालघर जिल्हाप्रमुख अॅड. ओमकार पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

माध्यान्ह भोजन योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना सकस आहार मिळणे आवश्यक आहे. प्रशासनाने केलेल्या नियमावलीनुसार ठेकेदाराला खाद्य पदार्थांचा ठरलेल्या वेळेत पुरवठा करावा लागतो. मात्र चालू शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये माध्यान्ह भोजन योजनेचा बोजवारा उडाला आहे. माध्यान्ह भोजन तयार करण्यासाठी आवश्यक असलेला तांदूळ, डाळी, सोयाबीन वडी, खाद्यतेल, मसाले, हळद, मोहरी, जिरे या साहित्यांचा बहुतेक शाळांमध्ये वेळीच पुरवठा होत नसल्याची जंत्रीच जिल्हाप्रमुख अॅड. ओमकार पाटील यांनी मांडली. त्याचा मोठा परिणाम या योजनेवर झाला आहे. परिणामी विद्यार्थ्यांना नियमित सकस आहार मिळत नाही. प्रशासन आणि ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे, असा आरोप अॅड. पाटील यांनी केला आहे.

स्टॉक रजिस्टर, बिलांची तपासणी करा

स्वयंपाकाच्या साहित्याचा वेळेवर पुरवठा होत नसेल तर या योजनेत मोठे झोल होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे माध्यान्ह भोजन योजनेचा कार्यादेश, निविदा प्रक्रिया, प्रत्यक्ष शाळांना झालेला साहित्याचा पुरवठा, डिलिव्हरी चलन, स्टॉक रजिस्टर, बिलांची देयके, यांची कसून तपासणी करण्यात यावी. याप्रकरणी अधिकाऱ्यांचीही स्वतंत्र चौकशी करण्यात यावी. संबंधित ठेकेदाराने शाळांना साहित्याचा पुरवठा न करता बिले काढली आहेत का, याचीही तपासणी व्हावी, आदी मागण्याही जिल्हाप्रमुख अॅड. ओमकार पाटील यांनी केल्या आहेत.

  • ठेकेदाराची चौकशी सुरू असेपर्यंत माध्यान्ह भोजनासाठी आवश्यक असलेल्या साहित्याचा पर्यायी पुरवठा सुरू ठेवण्यात यावा. या कालावधीत विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचनाही ओमकार पाटील यांनी केल्या आहेत.