
कल्याण-डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या आठवड्यात कल्याणच्या आधारवाडी आणि खडकपाडा परिसरातील ५८ नागरिकांचे लचके तोडल्याने घबराट पसरली होती. गेल्या सात महिन्यांत अठरा हजार कल्याण-डोंबिवलीकरांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. दोन्ही शहरांत सुमारे ५० ते ६० हजार भटके श्वान असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीसाठी पालिका दरवर्षी लाखो रुपयांची खैरात ठेकेदारांवर करते. मात्र ही नसबंदी कागदावरच होत असल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.
शहरातील रस्ते, कचराकुंड्या, वसाहती, झोपडपट्टी आदी भागांत भटक्या कुत्र्यांचे प्रमाण जास्त आहे. कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी, चक्कीनाका, नेवाळी नाका, पत्री पूल, कल्याण पश्चिमेतील बैलबाजार, वाडेघर, खाडी परिसर, मुरबाड नाका, टिटवाळा, बल्याणी, डोंबिवलीतील एमआयडीसी भाग, मानपाडा, नांदिवली, गरीबाचा वाडा याठिकाणी सर्वात जास्त भटक्या कुत्र्यांची दहशत आहे. शिवाय चिकन, मटण मार्केट, धाबे, चायनीज गाड्या ही तर भटक्या कुत्र्यांची आश्रयस्थाने आहेत. या ठिकाणी झुंडीने कुत्री फिरत असतात. भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला यांना तर जीव मुठीत घेऊन फिरावे लागते.
आरोग्य विभागाचे आवाहन
भटका कुत्रा चावल्यानंतर नागरिकांनी उपचार घेण्यास विलंब करू नये, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. महापालिकेच्या शासकीय रुग्णालयांमध्ये कुत्रा चावल्यानंतर आवश्यक लस आणि उपचार उपलब्ध असल्याची माहिती महापालिका मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांनी दिली आहे. तसेच जखम किरकोळ असल्याचे वाटले तरी नागरिकांनी वैद्यकीय सल्ला आणि उपचार घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
- यंदा सात महिन्यांत १८ हजार ४४७ जणांचे भटक्या कुत्र्यांनी लचके तोडल्याची आकडेवारी खुद्द पालिका प्रशासनाने दिल्याने खळबळ उडाली आहे. मात्र गेल्या वर्षी ३१ हजार १६५ डॉग बाईटच्या घटना घडल्या होत्या.
- जुलै महिन्यात कल्याण रुक्मिणीबाई रुग्णाल यातच ९५४ डॉग बाईटच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांतच २०० हून अधिक नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला.






























































