कोंदिवडे शाळेतील मुलींना शिवसेनेची सायकलींची भेट, आदित्य ठाकरे यांनी केले बाल रिपोर्टरच्या धाडसाचे कौतुक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खांडपे रस्त्याची दुरवस्था चव्हाट्यावर आणणाऱ्या कोंदिवडे शाळेतील विद्यार्थिनींना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून सायकलींची भेट देण्यात आली आहे. नेहा घारे, ज्योत्स्ना मुकणे आणि मानसी पवार या तीन शाळकरी मुलींनी छत्रीचा माईक आणि दप्तराचा कॅमेरा करून खड्यात गेलेल्या या रस्त्याचे ग्राऊंड रिपोर्टिंग केले होते. त्यांच्या धाडसाचे शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी कौतुक केले आहे.

कोंदिवडे-खांडपे रस्त्यावरील खड्डे, त्यामध्ये साचलेले पाणी आणि नागरिकांना होणारा त्रास, ही दयनिय अवस्था कोंदिवडे शाळेतील विद्यार्थिनी नेहा घारे, ज्योत्स्ना मुकणे आणि मानसी पवार यांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली होती. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेना आणि युवासेनेच्या शिष्टमंडळाने या मुलींची भेट घेऊन त्यांना सायकली भेट दिल्या. याप्रसंगी युवासेना कर्जत विधानसभा चिटणीस कल्पेश खडे, कर्जत तालुका चिटणीस पंकज म्हसे, अक्षय चव्हाण, समीर पेठे, राहुल भाटकर, साहिल मगर, परशुराम लोबो, योगेश थोरवे आणि प्रमोद सावंत उपस्थित होते.