शिंदे गटाच्या वादामुळे शार्लोट लेकचे पाणी पेटले, तलावातील गाळ काढण्याच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निसर्गाच्या सौंदर्याचे कोंदण लाभलेला आणि पिण्याच्या पाण्याचा एकमेव स्त्रोत असल्याने माथेरानकरांची जीवनवाहिनी असलेल्या शार्लोट लेकचे पाणी पेटले आहे. शिंदे गटाचे नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी तलावातील गाळ काढण्याच्या नावाखाली पाणी सोडून देण्याचे आदेश दिले. मात्र शिंदे गटाचे शहरप्रमुख आणि नगरसेवक मनोज खेडकर यांनी नगराध्यक्ष ठेकेदाराच्या हिताचा निर्णय घेत असून यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. शिंदे गटातच पेटलेल्या या वादामुळे माथेरानकरांचे मात्र पाणी पाणी झाले आहे.

शार्लोट तलाव स्वच्छ करण्यासाठी २०१६ पासून तत्कालीन नगराध्यक्षांपासून शासनाकडे पत्रव्यवहार सुरू होता. त्यासाठी सरकारने साडेचार कोटी रुपये मंजूर केले त्यानुसार शिंदे गटाचे नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी २५०० ट्रक गाळ उपसण्याचे नियोजनही केले. मात्र या कामाच्या दर्जाबाबत आणि गाळाच्या विल्हेवाटीबाबत शिंदे गटाचे शहरप्रमुख आणि नगरसेवक मनोज खेडकर यांनीच आक्षेप घेतला.

गाळ काढताना तो माथेरानमध्येच योग्य पद्धतीने साठवणे आणि त्याचा भविष्यात रस्ते बांधणीसाठी वापर करणे अपेक्षित होते. मात्र या कामात नियमांचे पालन झाले का, हा गाळ नेमका कुठे गेला? आणि ठेकेदाराने काम योग्य पद्धतीने केले का, यावरून माथेरानमध्ये मोठा गदारोळ झाला. त्यातच शार्लेट तलावातील पाणी अचानक सोडून दिले.

गाळ काढण्याच्या कामातील त्रुटी झाकण्यासाठीच तलावातील पाणी सोडण्यात आले, असा आरोप माथेरानकरांनी केला. गंभीर बाब म्हणजे पाणी सोडण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाला कोणतीही माहिती देण्यात आली नाही. पाण्यामुळे माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या परिसरात आपत्कालीन पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका असताना हा निर्णय नेमका कोणाच्या आदेशाने घेण्यात आला याचे उत्तर आता प्रशासनाला द्यावे लागणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तलावाचे दरवाजे बंद
माथेरानचे पाणी अचानक सोडून देण्याच्या निर्णयाविरोधात शिंदे गटाचे नगरसेवक मनोज खेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तलाव बंद करण्याचे आदेश दिले. त्यामुळे तलाव पूर्ण स्वच्छ न करताच तलावाचा दरवाजा तातडीने बंद करण्यात आला.