तन्झिद हसनने इतिहास घडवला; कांगारूंची तगडी गोलंदाजी फोडून काढत शतक झळकावले, 21 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशच्या 25 वर्षीय तन्झिद हसन तमीमने शतक झळकावत आपल्या नावाची नोंद सुवर्ण अक्षरात केली आहे. ऑस्ट्रेलियन भूमीवर कसोटी शतक झळकावणारा तो बांगलादेशचा पहिलाच फलंदाज ठरला आहे. डार्विन येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात 188 चेंडूंत आपल्या शतकाला गवसणी घालत तन्झिदने बांगलादेशला भक्कम स्थितीत पोहोचवले आहे. कारकिर्दीतील केवळ दुसराच कसोटी सामना खेळणाऱ्या तन्झिदच्या ऑस्ट्रेलियाची तगडी गोलंदाजी फोडून काढत हे शतक ठोकले.

तन्झिदने या खेळीदरम्यान हन्नान सरकार यांचा 21 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला. 2003 मध्ये केर्न्स येथे हन्नान सरकार याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 76 धावांची खेळी केली होती. तीच आतापर्यंत कोणत्याही बांगलादेशी फलंदाजाची ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती. तन्झिदने ही धावसंख्या पार करत बांगलादेश क्रिकेटच्या इतिहासात नव्या अध्यायाची नोंद केली आहे. विशेष म्हणजे पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि नॅथन लिऑन या जागतिक दर्जाच्या गोलंदाजीच्या माऱ्यासमोर तन्झिदने अत्यंत संयमी खेळ केला आणि क्रिकेट विश्वाला आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडले.

गोलंदाजांनंतर फलंदाजांचेही वर्चस्व

दरम्यान, या सामन्यात बांगलादेशची सुरुवातच धमाकेदार झाल. पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाज हसन महमूदने 55 धावांत 6 बळी घेत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीचा कणा मोडला आणि यजमानांना अवघ्या 198 धावांत गुंडाळले. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या बांगलादेशच्या संघाने संधीचे सोने केले. तन्झिदने दुसऱ्या गड्यासाठी मोमिनुल हकसोबत मिळून 102 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. मोमिनुल दुर्दैवीरित्या 49 धावांवर हेझलवूडचा शिकार ठरला.

शांतोचे शतक हुकले

मोमिनुल बाद झाल्यानंतर कर्णधार नजमूल हुसेन शांतोने तन्झिदला उत्तम साथ दिली. दोघांनीही ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना वरचढ होऊ न देता संघाची आघाडी सातत्याने वाढवली. शतकानंतर तन्झिद बाद झाला, तर शांतोही 86 धावांवर माघारी परतला. ताजे वृत्त हाती आले तेव्हा बांगलादेशच्या 6 बाद 324 धावा झाल्या होत्या.