दिल्ली विमानतळ आणि उच्च न्यायालयासह 6 ठिकाणी बॉम्बची धमकी, पोलीस तपास सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधी दिल्ली विमानतळ आणि उच्च न्यायालयासह सहा ठिकाणी बॉम्बची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली. बॉम्बच्या धमकीनंतर सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. उच्च न्यायालयाला ईमेलद्वारे ही धमकी मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांना माहिती देण्यात आली. पोलीस आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत उच्च न्यायालयाच्या परिसरात शोधमोहीम सुरू केली.

उच्च न्यायालयासह जामनगर हाऊस, झंडेवालन फ्लॅटेड बिल्डिंग, एम. बी. साकेत येथील जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालय, आयजीआय विमानतळाचे टर्मिनल 3 आणि दिल्ली कॅन्टमधील एसडीएम कार्यालयातही धमक्या मिळाल्याचे वृत्त आहे. या सर्व ठिकाणी संबंधित सुरक्षा पथके आणि अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीसह देशाच्या अनेक भागांमध्ये सुरक्षा व्यवस्था आधीच कडक करण्यात आली आहे. मोक्याच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, वाहतुकीची अतिरिक्त तपासणी केली जात आहे. सुरक्षा यंत्रणा सार्वजनिक ठिकाणे आणि गर्दीच्या भागांवरही लक्ष ठेवून आहेत.