मुलींच्या आवाजाने झोपमोड झाल्याने तरुण संतापला; चौघींवर कोयत्याने हल्ला, तिघींचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime news new

खेळताना मुलींच्या आवाजाने झोपमोड झाली. यामुळे संतापलेल्या तरुणाने चार निष्पाप मुलींना घरी बोलावून त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात तीन मुलींचा मृत्यू झाला असून एकीची प्रकृती गंभीर आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, त्या चार मुली आरोपी तरुणाच्या नातेवाईक होत्या. घटनेवेळी त्या आरोपीच्या घराशेजारी खेळत होत्या. खेळताना त्यांच्या आवाजामुळे आरोपी गुलाम सरवरची झोपमोड झाली. यामुळे संतापलेल्या गुलामने चारही मुलींना घरात बोलावले आणि अचानक कोयत्याने त्यांच्यावर हल्ला केला. एका मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चौथ्या मुलीवर उपचार सुरू आहेत.

आरोपीला ड्रग्जचे व्यसन असल्याचे एका मृत मुलीच्या वडिलांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आरोपी गुलाम सरवर उर्फ बादशाह याला ताब्यात घेतले. पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.