
कर्नाटकातील भाजप आमदाराच्या मुलीने एका महिला पोलीस अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंड्या जिल्ह्यातील श्रीरंगपट्टण तालुक्यातील आरती उक्कडा मंदिरात बुधवारी आयोजित भीम अमावस्या उत्सवादरम्यान ही घटना घडली. सविता पाटील असे महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. या घटनेनंतर क्यातनाहल्ली पोलीस ठाण्यात सविता यांनी ऐश्वर्या हिच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत तक्रार दाखल केली आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, ऐश्वर्या दर्शनासाठी मंदिरात आली होती. मंदिरात प्रवेश मिळण्यास झालेल्या विलंबावर तिने आक्षेप घेतला. त्यानंतर ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष सुरक्षा कर्तव्यावर असलेल्या महिला उप-निरीक्षक सविता पाटील यांना ऐश्वर्याने मारहाण केली. संबंधित पोलीस अधिकारी सविता पाटील या मंड्या महिला पोलीस ठाण्यात उप-निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
ऐश्वर्या या तुमकुरु ग्रामीणचे आमदार बी. सुरेश गौडा यांची मुलगी आहेत. तक्रारीनुसार, आमदाराची मुलगी ऐश्वर्या हिने पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ केली, कानशिलात लगावली आणि त्यांना कर्तव्य बजावण्यापासून रोखले. या वादग्रस्त घटनेनंतर संबंधित लोकप्रतिनिधींनी माफी मागितली आहे. संबंधित पोलीस अधिकाऱ्याने आपल्या मुलीला शिवीगाळ केल्याचा दावा आमदारांनी केला आहे. या प्रकरणात अजामीनपात्र कलमे समाविष्ट असूनही, ऐश्वर्या यांना अद्याप ताब्यात घेण्यात आलेले नाही किंवा त्यांना कोणतीही नोटीस बजावण्यात आलेली नाही.



























































