भाजप नेत्याची धारदार शस्त्राने वार करत हत्या; कारण अनभिज्ञ, आरोपींचा शोध सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजप नेत्याची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना शुक्रवारी पहाटे झारखंडमध्ये घडली. मिथिलेश यादव (35) असे मयत नेत्याचे नाव आहे. बागोदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हेसला ओव्हरब्रिजजवळ मिथिलेश यांची हत्या करण्यात आली. मिथिलेश मृतदेह हेसला येथील सर्व्हिस रोडवर पडलेला आढळला.

जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, मिथिलेश यादव हे भाजपच्या औरा मंडळाचे मंत्री होते. हेसला ओव्हरब्रिजजवळ त्यांचे एक वॉशिंग सेंटर होते. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी जमली. संतप्त नागरिकांनी आरोपींच्या अटकेची मागणी करत दिल्ली-कोलकाता राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा जीटी रोड बंद केला.

माहिती मिळताच, बागोदर-सरियाचे एसडीपीओ धनंजय कुमार राम, डुमरीचे एसडीपीओ आबिद खान, बागोदर पोलीस ठाण्याचे प्रभारी राजेश कुमार यांच्यासह डुमरी, निमियानघाट आणि सरिया पोलीस ठाण्याचे प्रभारी घटनास्थळी दाखल झाले. बागोदरच्या एसडीपीओंनी रस्ता अडवणाऱ्या नागरिकांची समजूत काढून रस्ता मोकळा केला.

घटनेच्या तपासासाठी गिरिडीहहून एक तांत्रिक पथक, एक फिंगरप्रिंट टीम आणि हजारीबागहून एक स्निफर डॉग बोलावण्यात आले. आवश्यक तपासानंतर, बागोदर पोलिसांनी शुक्रवारी दुपारी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी गिरिडीह सदर रुग्णालयात पाठवला. मृताच्या कपाळावर गंभीर जखमा होत्या आणि गुन्हेगारांनी त्याच्या दुचाकीचेही नुकसान केले होते. गुन्हेगारांनी मिथिलेश यांची हत्या करून अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. पोलीस पुढील तपास करत आहेत.