IND vs SL 1st Test – श्रीलंकेने यशस्वी जैस्वालची विकेट चोरली? गोलंदाजाने धक्का मारला अन्…, मैदानात हायव्होल्टेज ड्रामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि श्रीलंकेमध्ये आजपासून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरूवात झाली. गॉल येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत नाणेफेक जिंकून हिंदुस्थानने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या सत्रामध्ये हिंदुस्थानने दमदार फलंदाजी करत 1 बाद 101 धावा केल्या. सलामीवीर यशस्वी जैस्वाल 32 धावा काढून बाद झाला, तर केएल राहुल 32 आणि देवदत्त पडिक्कल 35 धावांवर नाबाद आहेत. फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर हिंदुस्थानच्या फलंदाजांनी पहिले सत्र गाजवले, मात्र यशस्वी जैस्वाल ज्या पद्धतीने धावबाद झाला त्यावरून आता वाद सुरू झाला आहे.

यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल या जोडीने हिंदुस्थानला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या दहा षटकांमध्ये हिंदुस्थानने 39 धावा फटकावल्या. यशस्वी चांगलाच रंगात आला होता आणि पाच चौकार ठोकत त्याने तिशीचा आकडा गाठला होता. अकराव्या षटकातील चौथ्या चेंडूवर यशस्वीने केशरा नुवांथा याला एक आकर्थक चौकार ठोकला. त्यानंतर पाचव्या चेंडूवर तीन धावा घेत केएल राहुल स्ट्राईकवर आला.

सहावा चेंडू राहुलने चेंडू मिड ऑनच्या दिशेने टोलवला आणि धाव घेण्यासाठी पळाला. यावेळी नॉन स्ट्राईकला उभ्या यशस्वीने त्याला प्रतिसाद दिला आणि धाव घेण्यासाठी पळाला. मात्र चेंडूकडे झेप घेताना केशरा नुवांथाचा धक्का यशस्वीला लागला आणि तो खाली पडला. मिड ऑनला उभ्या निरोशन डिकवेला याने चपळाईने चेंडू पकडत यष्टीरक्षकाकडे फेकला. यशस्वीने सावरत पुन्हा पळण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत चेंडू यष्टीरक्षकापर्यंत पोहोचला होता, तर दुसरीकडे केएल राहुलही नॉन स्ट्राईकला पोहोचला होता. श्रीलंकेच्या यष्टीरक्षकाने बेल्स उडवल्या आणि अशा विचित्र पद्धतीने यशस्वी धावबाद झाला.

India vs Sri Lanka 1st Test – हिंदुस्थानची प्रथम फलंदाजी; सरफराज खान, आकिब नबीला प्लेइंग 11 मध्ये स्थान नाही

श्रीलंकेच्या खेळाडूंनी धावबादची अपील केल्यानंतर मैदानावरील पंचांनी राहुल बाद झाला की यशस्वी हे पाहण्यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला. रिप्लेमध्ये राहुल नॉनस्ट्राईकला पोहोचल्याचे दिसत असल्याने यशस्वीला बाद देण्यात आले. बाद होण्यापूर्वी यशस्वीने 37 चेंडूत 32 धावांची खेळी केली.