पार्सल आणायला 5 मिनिटे उशीर झाला, डिलिव्हरी बॉयला ग्राहकाकडून अमानुष मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पार्सल आणायला केवळ 5 मिनिटे उशीर झाला म्हणून डिलिव्हरी बॉयला ग्राहकाने अमानुष मारहाण केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला आहे. तपासानंतर पोलीस पुढील कारवाई करतील.

इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, व्हायरल झालेला व्हिडिओ मेरठमधील भवानपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगा हाइट्स अपार्टमेंटमधील असल्याचे कळते. शुक्रवारी रात्री 9.30 च्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डिलिव्हरी बॉयचे नाव अमित असून, डिलिव्हरी देण्यास सुमारे पाच मिनिटे उशीर झाल्यामुळे त्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.

व्हायरल व्हिडिओच्या आधारे, पोलीस घटनेची सत्यता, ठिकाण आणि वेळेची चौकशी करत आहेत. या घटनेत सामील असलेल्या व्यक्तींची ओळखही पटवली जात आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये वादावादीदरम्यान ग्राहकाने डिलिव्हरी एजंटच्या हातातून मोबाईल फोन हिसकावून घेतल्याचे दिसते. त्यानंतर आरोपी डिलिव्हरी बॉयला कानशिलात मारताना आणि लाथा मारताना दिसत आहे.