
आर्जू टेकसोल प्रा.लि. कंपनीकडून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी शनिवारी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वातंत्र्यदिनी आंदोलन छेडले. आर्जू टेकसोल प्रकरणातील चौथा आरोपी अजून का सापडत नाही असा ज्वलंत प्रश्न उपस्थित करताना आमच्यावर जीव देण्याची वेळ आली आहे असे हताश होऊन गुंतवणूकदार आज सांगत होते.
आर्जु टेकसोल कंपनीतील आर्थिक फसवणुकीचा प्रकार तीन वर्षांपूर्वी उघडकीस आला होता. आर्जू टेकसोलमध्ये 6 कोटी 36 लाख 60 हजार 182 एवढी गुंतवणूक करण्यात आली होती. मात्र परतावा देण्याची वेळ आल्यानंतर कंपनीने आपला गाशा गुंडाळला होता. गुंतवणूकदारांना अद्यापही पैसे परत न मिळाल्याने आज स्वातंत्र्यदिन गुंतवणूकदारांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले. विलास सुर्वे यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यामुळे वातावरण तापले होते.
दरम्यान शहर पोलीस निरीक्षक आणि प्रांताधिकारी यांनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली. आर्जू टेकसोल प्रकरणातील चौथा आरोपी अजून का सापडत नाही असा सवाल आंदोलकांनी पोलिसांना विचारला. आर्जू टेकसोल कंपनीच्या गोदामातील मालाचा लिलाव करून गुंतवणूकदारांचे पैसे द्यावेत. त्याचबरोबर आर्जू टेकसोलच्या संचालकांची मालमत्ता जप्त करून न्यायालयीन प्रक्रियेसाठी झालेला खर्च वसूल करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
उपनिरीक्षक कुलदीप पाटील यांच्यावर कारवाईची मागणी
खंडाळा येथील तिहेरी खून प्रकरण उघडकीस आल्यानंतर जयगडचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक कुलदीप पाटील वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. कुलदीप पाटील यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी सामाजिक कार्यकर्त्या संध्या कोसुंबकर यांनी आज उपोषण केले. राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेत घोटाळा झाल्याचा आरोप करत इम्रान शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलन केले.






























































