
मानवी विष्ठेत आढळणारे ई-कोलाय (E. coli) जीवाणू देशाच्या अनेक रेल्वे स्थानकांवरील पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये आढळून आले आहेत. रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलर आणि नळांमधून घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केल्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणजेच कॅगच्या (CAG) अहवालात याचा उल्लेख करण्यात आला आहे. हिंदुस्थान टाइम्सने याबाबत वृत्त दिले आहे.
कॅगने देशभरातील विविध रेल्वे विभागांमधील 512 बिगर-उपनगरीय (Non-Suburban Group) स्थानकांवरील प्रवासी सुविधांचा आढावा घेतला. या तपासणीत दक्षिण रेल्वेच्या कोईम्बतूर आणि पालक्काड, दक्षिण मध्य रेल्वेच्या हैदराबाद, मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), भिवंडी रोड, कल्याण आणि लोणावळा तसेच पूर्व रेल्वेच्या मधुपूर या स्थानकांमधील पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर बाब समोर आली.
अहवालानुसार, 2022-23 मध्ये आठ रेल्वे विभागांमधील 49 स्थानकांवर आणि 2023-24 मध्ये नऊ विभागांमधील 56 स्थानकांवर प्लॅटफॉर्मवरील नळांमधून पिण्याच्या पाण्याचे नमुने घेण्यात आले. या नमुन्यांच्या तपासणीत टोटल कोलिफॉर्म्स जीवाणू आढळले. यामध्ये ई-कोलायचाही समावेश आहे.
ई-कोलायच्या काही प्रकारांमुळे अन्नातून विषबाधा, अतिसार आणि गंभीर परिस्थितीत मूत्रपिंड निकामी होण्यासारख्या आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे रेल्वे स्थानकांवरील पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
512 पैकी 458 स्थानकांवर मूलभूत सुविधांची कमतरता
कॅगच्या पाहणीत केवळ पाण्याच्या गुणवत्तेचीच समस्या समोर आली नाही, तर रेल्वे स्थानकांवरील मूलभूत सुविधांची स्थितीही खराब असल्याचे आढळले. निवडलेल्या 512 स्थानकांपैकी तब्बल 458 स्थानकांवर म्हणजेच सुमारे 90 टक्के स्थानकांवर ‘किमान आवश्यक सुविधा’ (Minimum Essential Amenities – MEA) उपलब्ध नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
एप्रिल 2018 मध्ये रेल्वे मंडळाने NSG-1 ते NSG-6 श्रेणीतील स्थानकांसाठी किमान आवश्यक सुविधा (MEA), शिफारस केलेल्या सुविधा (RA) आणि इच्छित सुविधा (DA) याबाबत सविस्तर सूचना जारी केल्या होत्या. या सूचनांनुसार 31 ऑगस्ट 2018 पर्यंत सर्व स्थानकांवर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले होते.
भारतीय रेल्वे स्थानकांचे महत्त्व आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या आधारे त्यांना NSG-1 ते NSG-6 अशा श्रेणींमध्ये विभागते. यातील NSG-1 श्रेणीतील स्थानके सर्वात महत्त्वाची मानली जातात. या श्रेणीतील स्थानकांमधून दरवर्षी 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रवासी उत्पन्न मिळते आणि तेथे 2 कोटींपेक्षा अधिक प्रवाशांची ये-जा होते.
स्थानकाची श्रेणी त्याठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधांचे प्रमाण आणि त्यासाठीचा निधी निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. प्रतीक्षागृहे, लिफ्ट, सरकते जिने, खानपान सुविधा यासह इतर सुविधा यावर त्याचा परिणाम होतो.
मात्र, रेल्वे मंडळाच्या सूचनांनुसार सर्व श्रेणीतील स्थानकांवर सर्वप्रथम किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. यामध्ये पिण्याचे पाणी, प्रतीक्षागृह, बसण्यासाठी व्यवस्था, प्लॅटफॉर्मवर छत, मूत्रालये, शौचालये, उंच प्लॅटफॉर्म, पंखे, पादचारी पूल (FOB), कचरापेट्या, घड्याळे आणि सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणेचा समावेश आहे.
मुंबई आणि नवी दिल्लीतील स्थानकांचाही समावेश
विशेष म्हणजे, NSG-1 श्रेणीतील मुंबई सेंट्रल, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), कोलकात्याजवळील हावडा आणि सियालदह तसेच नवी दिल्ली या महत्त्वाच्या स्थानकांवरही काही मूलभूत सुविधांची कमतरता असल्याचे कॅगला आढळले.
या स्थानकांवर बसण्याची व्यवस्था, स्वच्छताविषयक सुविधा, कचरापेट्या आणि इलेक्ट्रॉनिक माहिती फलक यांसारख्या सुविधांमध्ये त्रुटी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. देशातील प्रमुख आणि सर्वाधिक वर्दळीच्या स्थानकांमध्येही अशा सुविधा अपुऱ्या असल्याने रेल्वे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी करण्याची शिफारस
कॅगने रेल्वे प्रशासनाला पाणीपुरवठा व्यवस्थेच्या तपासणीसाठी निर्धारित नियमांचे काटेकोर पालन करण्याची शिफारस केली आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची सर्वसमावेशक तपासणी करण्याची गरज व्यक्त केली आहे.
‘युनिफॉर्म ड्रिंकिंग वॉटर क्वालिटी प्रोटोकॉल’मध्ये नमूद केलेल्या सर्व निकषांनुसार पाण्याची तपासणी केली जावी, अशी शिफारस कॅगने केली आहे. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना दिले जाणारे पिण्याचे पाणी सुरक्षित आणि आरोग्यासाठी योग्य आहे की नाही, याची नियमित तपासणी होणे आवश्यक असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे.























































