सुखबीर बादल यांच्यावरील हल्ला सुनियोजित राजकीय कटाचा भाग – हरसिमरत कौर बादल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांच्यावर महाराष्ट्रातील नांदेड येथे झालेल्या हल्ल्याप्रकरणी त्यांच्या पत्नी आणि भटिंडा लोकसभा मतदारसंघाच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांनी गंभीर आरोप केले आहेत. हा हल्ला एक ‘सुनियोजित राजकीय कट’ असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या हल्ल्यामागे जो कोणी असेल, त्याला शीख म्हणता येणार नाही, असेही त्यांनी म्हटले.

या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी केली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही पत्र लिहिल्याचे हरसिमरत कौर यांनी सांगितले. या हल्ल्यामागील कटाचा पूर्ण खुलासा होण्यासाठी प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास संस्थेकडून (NIA) करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

‘सुखबीर बादल राष्ट्रविरोधी शक्तींना घाबरणार नाहीत’

हरसिमरत कौर यांनी सांगितले की, सुखबीर सिंह बादल यांनी यापूर्वीच आपण कोणत्याही राष्ट्रविरोधी शक्तीला घाबरणार नसल्याचे सांगितले आहे. सुखबीर बादल लवकरच पंजाबमध्ये होणाऱ्या राजकीय सभांमध्ये सहभागी होतील, असेही कौर म्हणाल्या.