
नाशिकमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यावर बोलताना शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. तसेच हे अपघात नाही तर खून असून यासाठी महापालिकेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे; असा घणाघात संजय राऊत यांनी केला. नाशिक येथे आयोजित जनआक्रोश मोर्चा आधी पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी नाशिकमधील खड्ड्यांवरून सत्ताधाऱ्यांची आणि महापालिका प्रशासनाच्या कारभाराची पिसे काढली.
”सध्या नाशिक विद्रुप झालेलं दिसतंय. नाशिक कधी अशा परिस्थितीत दिसेल याची आम्ही कल्पना केली नव्हती. नाशिकचे खड्डे देशभरातील चेष्ठेचा विषय झालेला आहे. १० वर्षापूर्वी नाशिक हे खड्डेमुक्त शहर असा लौकिक झालेला होता. काल आम्ही मखमलाबादला गेलो होतो. त्यावेळी तेथील महिला डोळ्यात पाणी आणून तिथली आता काय अवस्था आहे ते सांगत होती. प्रशासनाने लोकांना रस्त्यावर स्विमिंगपूल तयार करून दिले आहेत. एवढे मोठ मोठे खड्डे आहेत. दोन चार असे खड्डे मी पाहिलेले आहेत ज्यात भाजपचे 80 नगरसेवक एकत्र टाकले जातील. काय करतेय महानगरपालिका प्रशासन, पालकमंत्री, कुंभमेळा मंत्री, आयुक्त. दहा लोकं मरण पावले आहेत. तुमच्या हलगर्जीपणामुळे दहा लोकं खड्ड्यात पडून मरतात आणि त्यानंतरही गिरीश महाजन, शहराचे महापौर, आयुक्त माफी देखील मागत नाही. हा एवढा निर्ढावलेपणा येतो कुठून? असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला.
”दहा लोकांचा मृत्यू ही साधी गोष्ट आहे का? ऑपरेशन सिंदूरमध्ये सहा सैनिक शहीद झाले. तर नाशिकमध्ये दहा जण मृत्युमुखी पडले. नाशिकमध्ये काय युद्ध सुरू आहे ते बघा. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये दिले. आमच्या जीवाची किंमत पाच लाख रुपये? एक कोटी दिले पाहिजे त्यांना आणि जखमींना पन्नास लाख. जखमींच्या बिलाचे आकडे पाहिले आम्ही. काही लोकं कोमात आहेत, काही अपंग झाले आहेत. त्यांची बिलं १० लाखाच्या पुढे गेली आहेत. कुठून देणार गरीब लोकं हे पैसे? महापालिका म्हणते की आम्हाला मर्यादा आहे त्यापेक्षा जास्त आम्ही देऊ शकत नाही. या प्रकरणी संपूर्ण महापालिकेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. ‘, असे संजय राऊत म्हणाले.
…तर भाजप नगरसेवकांच्या घरासमोर आंदोलन करू, संजय राऊत यांचा इशारा
”आमचे नगरसेवक सातत्याने त्याविरोधात आवाज उठवतायत. रस्त्यावर आंदोलनं सुरू आहेत. आम्ही रस्त्यावर काम करणारे कार्यकर्ते आहोत. आजचा मोर्चा हा नाशिककरांच्या सुरक्षेसाठी आहे. काल दोन मुली भेटल्या त्या म्हणाल्या आम्हाला मुलांना शाळेत पाठवायला भिती वाटते. ही नाशिकची परिस्थिती आहे. यावर कुणी संवेदनशीलपणे बोलले आहेत का? नाशिकच्या आयुक्तांची ताबडतोब बदली केली पाहिजे, एवढे खून होऊन थोडी तरी संवेदना दिसतेय का त्यांच्या चेहऱ्यावर? कधी फिरले का ते रस्त्यावर. त्या सर्वांना रस्त्यावर फिरवा तेव्हा त्यांना कळेल की त्यांच्या शहरातले लोकं कसे जगतायत. हे आंदोलन थांबणार नाही. हे आंदोलन संपल्यावर जर खड्डे बुजवले नाहीत तर ज्या ज्या भागात खड्डे आहेत तिथल्या भाजपच्या नगरसेवकाच्या घरासमोर आंदोलन करणार आहोत”, असे देखील संजय राऊत यांनी सांगितले.


























































