उज्जैनमध्ये नागचंद्रेश्वर मंदिराजवळ भाविकांची प्रचंड गर्दी; चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती, अनेक जण बेशुद्ध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

श्रावणातील सोमवारी मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये नागचंद्रेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी लाखो भाविक दाखल झाले. यामुळे मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली असून, नागचंद्रेश्वर मंदिराजवळ चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली. गर्दीचा दबाव वाढल्याने अनेक भाविकांची प्रकृती बिघडली आणि काही जण बेशुद्ध झाले. या घटनेमुळे परिसरात काही काळ अफरातफरीचे वातावरण निर्माण झाले.

टीव्ही 9 ने दिलेल्या वृत्तानुसार उज्जैनचे पोलीस अधीक्षक प्रदीप शर्मा यांनी सांगितले की, गर्दीमुळे काही भाविकांची प्रकृती बिघडली असून, दोन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरसिद्धी मंदिरासमोरील बॅरिकेडिंग केलेल्या परिसरात गर्दीचा दबाव अचानक वाढला होता. यावेळी काही भाविकांची प्रकृती बिघडल्याने परिस्थिती गंभीर बनली. घाबरल्यामुळे महिला, पुरुष आणि तरुणींना चक्कर येऊन काही जण बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. सध्या उज्जैन जिल्हा रुग्णालयात या भाविकांवर उपचार सुरू असून, डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.

श्रावणातील तिसऱ्या सोमवारी महाकाल आणि वर्षातून एकदाच उघडणाऱ्या नागचंद्रेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक उज्जैनमध्ये दाखल झाले आहेत. मंदिर परिसर तसेच आजूबाजूच्या रस्त्यांवरही मोठी गर्दी झाली आहे. आतापर्यंत पाच लाखांहून अधिक भाविकांनी महाकाल आणि नागचंद्रेश्वराचे दर्शन घेतल्याची माहिती आहे.