
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वर कार्यान्वित केलेल्या ओसरगाव टोल नाक्यावर स्थानिक वाहनधारकांचा प्रवास संपूर्ण टोलमुक्त करावा, सिंधुदुर्गवासियांची टोल लूट तातडीने थांबवावी, अशी आग्रही मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. स्थानिकांना पूर्ण टोलमाफी न दिल्यास ओसरगाव टोलनाका कायमचा बंद करण्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असाही इशारा शिवसेनेमार्फत देण्यात आला आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ओसरगाव टोलनाका सुरू करतानाच अवाच्या सव्वा टोल वापर शुल्क जाहीर केले. याचवेळी स्थानिक वाहनधारकांना टोलमाफी देण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला नाही. यामाध्यमातून सिंधुदुर्गवासीयांची मोठय़ा प्रमाणात फसवणूक केली जात असल्याने शिवसेनेने आक्रमक भूमिका टोलवसुली निर्णयाचा तीव्र निषेध केला आहे. या संदर्भात शिवसेना नेते सचिव विनायक राऊत यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. ओसरगाव टोल नाक्यावर सिंधुदुर्ग जिह्यातील स्थानिक वाहनधारकांचा प्रवास संपुर्ण टोलमुक्त करण्यात यावा, अशी आग्रही मागणी शिवसेनेने वारंवार केली.
जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गनगरी हे ठिकाण जिह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने सरकारी कामांसाठी लोकांना वारंवार जिल्हा मुख्यालयात जावे लागते तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना याच रस्त्याने रोज ये-जा करावी लागते. त्यामुळे टोल वसुली सुरू केल्यास जिल्हावासीयांची आर्थिक लूट होणार आहे. ही लूट तात्काळ थांबवावी अन्यथा ओसरगाव टोल नाका कायमचा बंद करण्यासाठी मोठे आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा शिवसेना नेते विनायक राऊत यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
सिंधुदुर्गवासीयांची लुबाडणूक कदापि सहन करणार नाही!
मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यात छोटया वाहनांना पहिला टप्पा हा 65 रुपये आहे, तर ओसरगाव टोल दरांमध्ये छोटय़ा वाहनांना पहिला टप्पा 125 रुपये इतका आकारला जाणार आहे. यामधूनच ठेकेदार आणि अधिकारी यांच्या माध्यमातून सिंधुदुर्गवासीयांना कसे लुबाडायचे हे सिद्ध झाले आहे. सिंधुदुर्गवासीयांची केली जाणारी लुबाडणूक कदापी सहन करणार नाही, असेही शिवसेनेतर्फे संबंधित अधिकाऱयांना बजावले आहे.

























































