
‘रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा’ या भावनेने गेली 43 वर्षे सर्वसामान्य आणि ग्रामीण भागातील रुग्णांची सेवा करणारे डॉ. चंद्रकांत यळगुडकर यांचा संगमेश्वर तालुका पत्रकार संघातर्फे विशेष सन्मान करण्यात आला.
आज वैद्यकीय क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन अनेक कारणांमुळे बदलला असला तरी पैशापेक्षा रुग्णसेवेला प्राधान्य देणाऱया डॉ. चंद्रकांत यळगुडकर यांचे कार्य प्रेरणादायी आहे. रुग्ण हा पेंद्रबिंदू मानून सेवा कशी करावी, याचा आदर्श त्यांनी आपल्या चार दशकांच्या कार्यातून निर्माण केला आहे. अनेक गरजू रुग्णांना उपचारांसाठी तसेच प्रवासासाठी त्यांनी आर्थिक मदत केली. त्यांचे कार्य केवळ वैद्यकीय सेवा नसून माणुसकीची सेवा आहे. वैद्यकीय क्षेत्रात येणाऱया नव्या पिढीने त्यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन संगमेश्वर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरेश सप्रे यांनी केले. या सोहळ्याला ज्येष्ठ पत्रकार अजित आंबेकर, नेहा यळगुडकर, डॉ. माधव यळगुडकर, मानसी यळगुडकर तसेच पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

























































