दोन वर्षांत कल्याण-बदलापूर रेल्वे प्रवास फास्ट ट्रॅकवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते बदलापूरदरम्यानचा प्रवास पुढील दोन वर्षांत ‘फास्ट ट्रॅक’वर येणार आहे. या दोन स्थानकांदरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत (एमआरव्हीसी) युद्धपातळीवर केले जात आहे. एमयूटीपी-३ ए अंतर्गत अतिरिक्त मार्गिकांचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. अंदाजे १,५१० कोटींचा खर्च असलेल्या या प्रकल्पाचे काम ५२ टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले असून २०२८ मध्ये दोन्ही मार्गिका प्रवासी सेवेत खुल्या करण्याचे नियोजन आहे.

कल्याण ते बदलापूरदरम्यान सध्या केवळ दोन मार्गिका आहे. या मार्गिकावरून उपनगरी रेल्वे आणि मेल-एक्सप्रेस गाड्या चालवल्या जात आहेत. त्यामुळे लोकल सेवेच्या वेळापत्रकावर परिणाम होऊन प्रवाशांची गैरसोय होत आहे. ही समस्या दूर करण्याच्या हेतूने एमआरव्हीसीने तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकांच्या कामाला गती दिली आहे. प्रकल्पांतर्गत आतापर्यंत ३१ पुलांचे बांधकाम पूर्ण केले आहे.

अतिरिक्त रेल्वे मार्गिकांमुळे कल्याण ते बदलापूर विभागाची रेल्वे क्षमता लक्षणीयरीत्या वाढेल. उपनगरी रेल्वे आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचे सुरळीत संचालन करता येईल. त्यामुळे बदलापूर परिसरातील प्रवाशांचा लोकल प्रवास अधिक वेगवान बनेल.
सुनील उदासी, मुख्य व्यवस्थापक, (कॉर्पोरेट कोऑर्डिनेशन), एमआरव्हीसी