
>> प्रभाकर पवार
बेस्ट बसेस, रेल्वे किंवा गर्दीच्या ठिकाणी एकत्र येऊन प्रवाशांचे स्मार्ट फोन लंपास करणाऱ्या संघटित टोळ्या मुंबईसह देशभरात, जगभरात सक्रिय आहेत. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्याम नायर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अंधेरी पूर्व ते अंधेरी सिप्झ घाटकोपर मार्गावरील बेस्ट बसेसमध्ये शिरून प्रवाशांचे मोबाईल लंपास करणाऱ्या सात जणांच्या एका टोळीला अलीकडे अटक केली व त्यांच्याकडून महिनाभरात चोरी केलेले महागडे असे १३५ स्मार्टफोन जप्त केले आहेत. अटक करण्यात आलेल्या टोळीला गुन्हेगारी जगतात धक्का गैंग म्हणून संबोधले जाते. बस किंवा रेल्वेत शिरल्यानंतर गर्दीचा फायदा घेऊन ही धक्का गैंग एका क्षणात लंपास केलेला मोबाईल घेऊन पसार होते. ज्याच्यावर संशय असतो त्याने चोरलेला मोबाईल आडोशाला उभ्या असलेल्या आपल्या अन्य एका साथीदाराकडे सरकवलेला असतो. त्याने तो तिसऱ्याकडे दिलेला असतो. अशा कार्यपद्धतीने पास’ झालेला मोबाईल प्रवाशाच्या काही हाती लागत नाही किंवा चोरही पकडला जात नाही. अखेर तो प्रवासी निराश होऊन पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करतो. मुंबईत अशा बऱ्याच ‘धक्का’ गैंग आहेत. त्यांचा सुळसुळाट आहे.
मुंबई शहर व उपनगरात रोज किमान १५० ते २०० मोबाईल चोरीला जातात. मोबाईल हरविल्याच्याही रोज तक्रारी नोंदविल्या जातात. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलच्या कुर्ला, ठाणे, अंधेरी, बोरिवली आदी ठिकाणी मोबाईल चोरीच्या तक्रारी अधिक असतात. भारताची राजधानी दिल्ली व कर्नाटकाच्या बंगळुरू शहरांत रोज सरासरी ७०० च्यापुढे मोबाईल लंपास केले जातात. भारत देशात रोज सुमारे २ हजार मोबाईल चोरीला जातात. दिल्ली, बंगळुरू, मुंबई हे गुन्हेगारांचे हॉटस्पॉट आहेत. आज जगभरात रोज १० लाखांच्या वर मोबाईल चोरीला जातात. त्यात हरवलेल्या मोबाईलची संख्या ही लक्षणीय आहे.
महागडे स्मार्टफोन किंवा आयफोन थेट नेपाळ, बांगलादेश किंवा आखाती देशांमध्ये स्मगल केले जातात आणि तिथे चढ्या किमतीत विकले जातात. एक अत्यंत प्रतिष्ठित आणि ख्यातनाम विधिज्ञ हरीश साळवे यांच्या पत्नीचा लंडनमधील Bond Street या अत्यंत महागड्या व प्रसिद्ध परिसरातून चोरट्यांनी भर रस्त्यात त्यांना धक्का मारून त्यांच्याकडील अॅपलचा आयफोन पळवून नेला. साळवे यांच्या पत्नीने लंडन पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करण्याचा प्रयत्न केला, परंतु लंडन पोलिसांनी त्यांना फारसा प्रतिसाद दिला नाही. तेथील पोलीस त्यांना हतबल दिसले. हल्ला करून मोबाईलफोन पळवून न्यायचा हा लंडनमधील नित्याचा प्रकार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तुमच्या जवळील वस्तूंची जबाबदारी तुम्ही घ्यायला हवी असेही पोलिसांनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात लंडन काय किंवा युरोप काय, आता पर्यटकांसाठी युरोप असुरक्षित झाले आहे. पर्यटन स्थळ मोबाईल चोरांचे हॉटस्पॉट झाले आहेत. लंडनमध्ये गेल्यावर्षी ६१ हजारांहून अधिक मोबाईल चोरट्यांनी हिसकावून नेल्याची नोंद झाली आहे. रोज शेकडो पर्यटक चोरांची शिकार होत आहेत. फोटो, व्हिडीओ शूटिंग करताना पर्यटकांचे मोबाईल हिसकावले जातात. कधी कोणता गुन्हेगार मोटरसायकलवरून येईल आणि हातातील मोबाईल पळवून नेईल याची लंडन किंवा युरोपमध्ये खात्रीच राहिलेली नाही. एकेकाळी युरोप हे सुरक्षित समजले जायचे, परंतु आपली ही समजूत आता चुकीची ठरू लागली आहे. परदेशात पोहोचल्यावर बऱ्याच पर्यटकांना आपण सुरक्षित देशात पोहोचलो असे वाटते आणि ते बिनधास्त होतात. ही मानसिकता आता बदलण्याची गरज आहे. पर्यटकांनी भर रस्त्यात कुठला तरी कोपरा पकडून मोबाईलवर बोलणे टाळले पाहिजे. पासपोर्ट, मोठी रक्कम आणि बैंक कार्ड एकाच पाकिटात ठेवणे धोक्याचे असते.
जगातील कोणतेही मोठे शहर गुन्हेगारीपासून आज मुक्त नाही. युरोप म्हटले की, डोळ्यांसमोर लंडनचे राजवैभव, पॅरिसचा आयफेल टॉवर, रोमचा इतिहास, स्वित्झर्लंडचे निसर्गसौंदर्य, बार्सिलोनाची वास्तुकला आणि अॅमस्टरडॅमची जीवनशैली दिसते. जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या या शहरांची सुरक्षिततेची प्रतिमा आजही मोठ्या प्रमाणात कायम आहे. परंतु सध्याच्या डिजिटल युगात गुन्हेगारीचे स्वरूप बदलले आहे. पूर्वी पाकिटमारी मोठ्या प्रमाणात व्हायची. आता मोबाईल फोनची स्नॅचिंग जगभरात मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
परदेशात पर्यटकांची सुरक्षितता राखण्यासाठी टूर कंपन्यांनी प्रवासापूर्वीच सुरक्षितता, मार्गदर्शक सूचना देणे, गर्दीच्या ठिकाणी गाईडची नेमणूक करणे, मोबाईल व किमती वस्तू सांभाळण्याबाबत पर्यटकांमध्ये सतत जागरुकता निर्माण करणे आणि आपत्कालीन प्रसंगी तत्पर मदत यंत्रणा तयार ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. नामांकित वीणा, केसरीसारख्या बऱ्याच कंपन्या पर्यटकांची काळजी घेतात, परंतु अलीकडे बोगस व फसवणूक करणाऱ्या टूर कंपन्यांनी टूर व्यवसायात शिरकाव केल्याने पर्यटक फसत आहेत. खूप स्वस्त व अवास्तव ऑफर्सच्या मायाजालात अडकून स्वतःची फसवणूक करून घेत आहेत. बोगस दूर कंपन्यांपासून बचाव करण्यासाठी पर्यटकांनी कंपनीची कायदेशीर नोंदणी परवाना आणि जुन्या ग्राहकांचे रिव्यू ऑनलाईन तपासून परदेशवारी केली पाहिजे. नाहीतर परदेशात गेल्यावर तुमच्यावर कोणते संकट ओढवेल हे सांगता येणार नाही. थोडक्यात मुंबईसह जगभरात धक्का गैंगचा सुळसुळाट वाढला आहे. जनहो, सावधान! आपले स्मार्टफोन सांभाळा!!



























































