दिल्लीत सीएनजी पंपावर सिलिंडरचा भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, ६ जण गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील टिकरी कलां परिसरातील एका सीएनजी पंपावर वाहनात गॅस भरताना भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून, सुमारे सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. स्फोट इतका जोरदार होता की, त्याचा हादरा दूरपर्यंत जाणवला आणि संपूर्ण परिसरात एकच घबराट उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, टिकरी कलां येथील सीएनजी स्टेशनवर एका वाहनात सीएनजी सिलिंडर रिफिलिंग करण्याचे काम सुरू असताना अचानक हा स्फोट झाला. सिलिंडरमधील अतिरिक्त दाब किंवा तांत्रिक त्रुटीमुळे ही दुर्घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. स्फोट होताच पंपावर प्रचंड गोंधळ निर्माण झाला आणि काही क्षणातच धुराचे लोट पसरले. या स्फोटाच्या तीव्रतेमुळे पंपावरील साहित्य आणि जवळ उभ्या असलेल्या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशामक दलाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. सुरक्षेचा उपाय म्हणून पंपावरील गॅस पुरवठा तातडीने बंद करण्यात आला. सर्व जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून, सिलिंडरची गुणवत्ता, नियमित चाचणी झाली होती का आणि रिफिलिंगदरम्यान नियमांचे पालन झाले होते की नाही, या सर्व पैलूंचा फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने तपास सुरू केला आहे.