
उत्तराखंडमधील डेहराडून-ऋषिकेश महामार्गावरील मणिमाई मंदिराजवळ भीषण अपघात घडला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहनातून जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. चार मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलीस अपघाताचा तपास करत आहेत.
टीव्ही 9 भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, सात जण मारुती इको कारमधून देहरादूनहून रोहतकला प्रवास करत होते. मणिमाई मंदिराजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महिंद्रा मॅक्स वाहनाला कारची धडक बसली. या धडकेत इको कारचे मोठे नुकसान झाले. स्थानिकांच्या मदतीने पोलीस पथकाने गाडीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढले.
अपघातात चालकासह दोघांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या इतर दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्या तिघांवर डेहराडूनमधील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली होती. पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून हटवण्यात आली, त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.

























































