
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. गेल्या १२ वर्षांत मोदी सरकारने देशातील तरुणांचे भविष्य पूर्णपणे उद्ध्वस्त केले असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात, इंदिरा भवन येथे आयोजित काँग्रेस वर्किंग कमिटीच्या (CWC) बैठकीला संबोधित करताना खरगे असे म्हणाले आहेत.
ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, देशातील तरुणांची सद्यस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे तरुण वर्ग खोल नैराश्यात ढकलला गेला आहे. नवीन शाळा सुरू करण्याऐवजी गेल्या काही वर्षांत देशातील तब्बल ९४,००० शाळा बंद पडल्याचा दावा त्यांनी केला. तसेच खाजगीकरणाच्या वाढत्या प्रभावामुळे उच्च शिक्षण सर्वसामान्य कुटुंबांच्या आवाक्याबाहेर गेले असून शैक्षणिक संस्थांवर एका विशिष्ट विचारसरणीचा ताबा वाढवला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
खरगे यांनी भरती प्रक्रियेतील त्रुटींवर बोट ठेवत सांगितले की, आज उच्चशिक्षित तरुण पेपरफुटी, परीक्षांमधील घोटाळे आणि नियुक्ती प्रक्रियेतील प्रचंड विलंबाचा सामना करत आहेत. याचा सर्वाधिक फटका गरीब आणि वंचित घटकांतील मुलांना बसत आहे. संसदेच्या अधिवेशनात सरकारकडून या विषयांवर उत्तर देण्याचे टाळले गेले, असेही ते म्हणाले.




























































