Ratnagiri News – व्हॉटसॲपवरील ओळखीतून दाम्पत्याला 11 लाख 37 हजार रुपयांचा चुना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्हॉटसॲपवरील ओळखीतून दाम्पत्याला तब्बल 11 लाख 37 हजार रुपयांचा चुना लावल्याप्रकरणी दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूकीची ही घटना 25 जून 2026 ते 23 जुलै 2026 या कालावधीत कुवारबाव परिसरात घडली आहे.

सोनल जगन्नाथ नाईक आणि कुणाल सुमया अशी गुन्हा दाखल केलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. त्‍यांच्या विरोधात फसवणूक झालेल्या विवाहितेने मंगळवारी 18 ऑगस्ट रोजी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्‍यानुसार, सोनल नाईक या महिलेने तक्रारदार महिलेच्या पतीशी व्हॉटसॲपवरुन ओळख झाली होती. त्‍यानंतर संशयित सोनल नाईकने या दाम्पत्याचा विश्वास संपादन करुन ‘जुलिअस बेअर मोबाईल’ हे ट्रेडिंग ॲप्लिकेशन तक्रारदार महिलेच्या पतीच्या मोबाईलमध्ये लॉगइन करण्यास सांगून ‘आयपीओ व ओटीसी’ ट्रेडिंगमध्ये कमी वेळात जास्त नफ्याचे आमिष दाखवले.

त्‍यानंतर 25 जून 2026 ते 23 जुलै 2026 या कालावधीत संशयित सोनलने तिच्या व्हॉटॲपवरुन वेळोवेळी फिर्यादी व तिच्या पतीची दिशाभूल करुन पैसे गुंतवण्यास भाग पाडले. त्‍यानंतर कुणाल सुमया याने आपण ‘ज्युलिअस बेअर मोबाईल’ चा हेड असल्याचे भासवून कंपनीच्या नियमाप्रमाणे संपूर्ण रक्कम तुम्हाला भरावी लागेल असे वारंवार सांगून फिर्यादी यांचे जॉईंट खाते, आयसीआयसीआय ,बँक खाते येथून 11 लाख 17 हजार 14 रुपये व त्‍यांचे पती महेंद्र यांच्या आयसीआयसीआय बँक, एन.आर.आय बँक खात्‍यातून 20 हजार रुपये अशी एकूण 11 लाख 37 हजार 14 रुपयांची फसवणूक केली. त्‍यांच्या तक्रारीवरुन संशयितांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 318(4),319(2),3(5) माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (सी),(डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.