
उत्तर प्रदेशातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये पायाभूत सुविधांच्या गंभीर तुटवड्याविरोधात शालेय विद्यार्थ्यांनी थेट रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे. स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वर्गांमधील पंखे आणि शिक्षकांची उपलब्धता यांसारख्या मूलभूत मागण्यांसाठी ६ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांनी तीव्र निदर्शने केली. सोशल मीडियावर या आंदोलनाला ‘जेन अल्फा’ पिढीचे आंदोलन म्हणून मोठी प्रसिद्धी मिळत असून, प्रशासनाला अखेर विद्यार्थ्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फतेहपूर जिल्ह्यातील किशनपूर येथील सर्वोदय इंटर कॉलेजमध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी सकाळी शाळा सुरू होताच जोरदार निदर्शने सुरू केली. हातामध्ये तिरंगा ध्वज घेऊन विद्यार्थ्यांनी शाळेच्या गेटबाहेर तब्बल पाच तास ठिय्या आंदोलन केले. अनेक महिन्यांपासून वारंवार तक्रारी करूनही शाळेतील सुविधा सुधारल्या नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. वर्गांमध्ये बंद पंखे, धोकादायक वीज पुरवठ्यामुळे बसणारे विजेचे झटके, पिण्याच्या पाण्याचा अभाव, संगणक लॅब आणि ग्रंथालय बंद असणे यासह प्रवेशादरम्यान व गुणपत्रिका देताना बेकायदेशीर पैसे उकळले जात असल्याचे गंभीर आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे.
आंदोलनाची तीव्रता पाहून स्थानिक पोलीस आणि शिक्षण विभागाचे जिल्हा निरीक्षक राकेश कुमार यांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी थेट चर्चा करून येत्या २४ तासांत प्राथमिक समस्यांचे निवारण करण्याचे आणि पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह व पंख्यांची व्यवस्था करण्याचे लेखी आश्वासन दिले. तसेच बेकायदेशीर शुल्क वसुलीच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करण्याचे निर्देश दिले.
VIDEO | Unnao, UP: Students of Jayaprakash Narayan Sarvodaya Vidyalaya stage a protest over a shortage of teachers and concerns about food quality.
(Full video available on PTI Videos – https://t.co/d8jp61yd2p) pic.twitter.com/FOBa5dLjlA
— Press Trust of India (@PTI_News) August 19, 2026




























































